मुंबईच्या फळ बाजारात परदेशी मलावी हापूसची आवक सुरू; ५९८ बाॅक्स ची आयात; ४५०० ते ५५०० रूपये बाॅक्स ला भाव
By नारायण जाधव | Updated: November 11, 2023 11:24 IST2023-11-11T11:24:25+5:302023-11-11T11:24:54+5:30
सध्या आंब्याचे दर खिशाला परवडणारे नसले तरी ऐन दिवाळीत त्याची चव खवय्यांना चाखता येणार आहे

मुंबईच्या फळ बाजारात परदेशी मलावी हापूसची आवक सुरू; ५९८ बाॅक्स ची आयात; ४५०० ते ५५०० रूपये बाॅक्स ला भाव
नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील हापूस आंब्याची आयात सुरू झाली आहे. शनिवारी 598 बाॅक्स ची आवक झाली असून 10 ते 16 आंब्याच्या बाॅक्स ला 4500 ते 5500 रूपये भाव मिळत आहे.
फळांच्या राजाची गोडी जगभरातील अनेक देशातील नागरिकांना आवडू लागली आहे. भारतामधून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात होते. पण आता इतर देशांमध्येही आंबा लागवड सुरू झाली आहे. दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातही आंबा लागवड केली जात आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये मलावी हापूस विक्रीसाठी भारतात येतो. यावर्षी शनिवारी आंब्याची आवक झाली आहे. पहिल्या दिवशी 598 बाॅक्स आले आहेत. बाॅक्समध्ये दहापासून 16 आंबे आहेत. प्रथेप्रमाणे पहिल्या बाॅक्स चे पुजन करण्यात आले. मलावी हापूस ला प्रतीबाॅक्स 4500 रूपये भाव मिळत आहे. यावर्षी नोव्हेंबर मध्येच कोकण, केरळसह विदेशातून आवक सुरू झाल्याने मार्केट मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलावी देशातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबर पासून आवक वाढेल. डिसेंबर पर्यंत हंगाम सुरू राहील.
संजय पानसरे, संचालक फळ मार्केट
कोकणातून नेली रोपे
मलावी देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे. 2011 मध्ये तेथील शेतक-यांनी कोकणातून हापूस ची रोपे नेली. तेथे 400 एकरवर आंबा बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर मध्ये येथील आंबा विक्रीसाठी विविध देशात पाठविला जातो.