खारघरसह कोपरीतून दहा बांगलादेशींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:47 IST2024-12-24T08:47:08+5:302024-12-24T08:47:17+5:30
आश्रय देणाऱ्या घरमालकांवरदेखील होणार कारवाई

खारघरसह कोपरीतून दहा बांगलादेशींना अटक
नवी मुंबई : शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दहा बांगलादेशींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. खारघर व कोपरी येथे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. त्यांना आश्रय देणाऱ्या व कामाला ठेवणाऱ्यांवरदेखील पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.
घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशींना शहरात आश्रय मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या घुसखोरांच्या शोधासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी पथक केले होते. त्यात सहायक निरीक्षक अलका पाटील, सविता गुडे, महेंद्र ठाकूर, शिरीष चव्हाण, अनिल मांडोळे, ज्योती अडकमोल, अनिता गोळे, धनश्री घोणसेकर यांचा समावेश होता. त्यांनी शहराच्या विविध भागांत बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची माहिती मिळवली. त्यात संशयित व्यक्तींची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. यामध्ये काहींकडे भारतीय असल्याचा पुरावा नसल्याचे उघड झाले. त्यात खारघरच्या कोपरा येथे १ पुरुष व तीन महिला, तर कोपरी येथे १ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. त्यातील एकजण पासपोर्टद्वारे भारतात आला होता, पण एक वर्षापूर्वी व्हिसा संपूनही तो भारतात लपून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले.
मायदेशी पाठविण्याची तयारी
आराेपींना परत बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही संशयितांची चौकशी करून त्यांची कागदपत्रे पडताळणी सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. त्यांची कागदपत्रे बनावट निघाल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.