तळोजा कारागृहात टेलीमेडिसिन
By Admin | Updated: July 8, 2017 06:06 IST2017-07-08T06:06:02+5:302017-07-08T06:06:02+5:30
तळोजा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालय, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जाण्याची गरज आता

तळोजा कारागृहात टेलीमेडिसिन
वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : तळोजा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालय, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जाण्याची गरज आता भासणार नाही. कारागृहातील कैद्यांवर आता टेलीमेडिसिनद्वारे उपचार करण्यात येत असल्यामुळे कारागृहातील पोलिसांवर ताण कमी झालेला आहे. तळोजा कारागृहात एकूण २३०० कैदी आहेत. विशेष म्हणजे, कैद्यांना उपचारासाठी घेऊन जाताना अनेक कैदी पसार होण्याच्या घटनांना या नवीन तंत्रज्ञानामुळे लगाम बसणार आहे.
तळोजा कारागृह हे महाराष्ट्र शासनाने स्वातत्र्यानंतर स्वत: बांधलेले राज्यातील पहिले कारागृह आहे. या कारागृहात कुविख्यात आरोपी, गँगस्टर आदी शिक्षा भोगत आहेत. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आबू सालेम, छोटा राजन टोळीचे हस्तक आदींसह नायजेरियन कैदी मोठ्या प्रमाणात आहेत. कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २ वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत. कैद्यांना गंभीर आजार उद्भवल्यास त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात घेऊन जावे लागत असे, एका आरोपीला घेऊन जाताना पोलीस अधिकारी, तीन-चार पोलीस कर्मचारी, वाहन असा वाढीव बंदोबस्त द्यावा लागतो. त्यात बॉम्बस्फोटातील कैदी अथवा गँगस्टर असल्यास ने-आण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ लागते. पोलिसांच्या वाहनांसाठी इंधनापोटी लाखो रुपयांचा खर्च लागतात. टेलीमेडिसिन सुविधेद्वारे या सर्व खर्चावर आळा बसणार आहे. कारागृहातील दररोज कमीत कमी ६ कैदी या सुविधेचा लाभ घेत आहेत.
काय आहे टेलीमेडिसिन सुविधा
टेलीमेडिसिन सुविधेमध्ये सर्वप्रथम कारागृहातील अधिकारी कैद्याच्या आजाराची माहिती ई-मेलद्वारे संबंधित रुग्णालयाला देतो. त्यानंतर डॉक्टर आणि कैद्यांचा थेट संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साधला जातो. यामध्ये कैद्याशी डॉक्टर थेट संवाद साधून त्याच्या आजारपणाची विचारपूस करून त्याला योग्य ती औषध पुरविली जातात. यामुळे कैद्याच्या आजारावर योग्य ते निदान केले जाते. तळोजा कारागृहातून जे. जे. रुग्णालय व अलिबाग शासकीय रुग्णालयात ही सुविधा जोडल्याची माहिती कारागृहाचे मुख्य अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी दिली.