पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:39 IST2025-09-07T14:39:11+5:302025-09-07T14:39:11+5:30
अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विजय पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांचे निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : मेरेथॉन पनवेल इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी पनवेल तालुक्यातील मौजे वारदोली, पोयंजे, भिंगारवाडी, भिंगार, पाली बुद्रुक व मौजे भेरले येथील जमिनी या महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ६३ एक-अ मधील तरतूदीन्वये खऱ्या खुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी सन २००७ मध्ये खरेदी केल्या होत्या, त्यामुळे सदर जमिनीवर कलम ६३ एक-अ मधील तरतूदीन्वये कार्यवाही करणे अपेक्षित असताना तहसीलदार विजय पाटील यांनी सदर बाबीकडे जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष करुन कलम ६३ एक- अ मधील तरतुदींचा भंग करुन सदर जमिनीना अकृषिक सनद देण्याची अनियमितता केल्याचा ठपका ठेवत विजय पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
पाटील यांची कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन करणारी असल्याने अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या सहीने हे निलंबन करण्यात आले आहे. , प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत विजय पाटील, यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, रायगड यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये असे या आदेशात म्हटले आहे .दरम्यान विजय पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.