सुप्रीमने बुडविले २९ कोटी
By Admin | Updated: August 30, 2016 02:29 IST2016-08-30T02:29:07+5:302016-08-30T02:29:07+5:30
मनोर-वाडा-भिवंडी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेली माती, खडी, व रेती या गौण खनिजापैकी ७ लाख ५० हजार ब्रास गौणखनिजांच्या स्वामित्वधनाची सुमारे २९ कोटी

सुप्रीमने बुडविले २९ कोटी
हितेन नाईक, पालघर
मनोर-वाडा-भिवंडी रस्त्यांच्या कामासाठी वापरलेली माती, खडी, व रेती या गौण खनिजापैकी ७ लाख ५० हजार ब्रास गौणखनिजांच्या स्वामित्वधनाची सुमारे २९ कोटी रुपयांची रक्कम ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने बुडविल्याचा सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांचा आरोप खरा ठरला असून तिच्या वसुलीची प्रक्रिया पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरु झाली आहे. जर आताच्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम वसूल केल्यास ती सुमारे १४५ कोटी इतकी होऊ शकते.
सुप्रीम इन्फ्रा.प्रायव्हेट लिमिटेडच्या ठेकेदाराने मनोर-वाडा-भिवंडी या ३८० कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम हाती घेतले होते. या रस्त्याच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या रेती, माती, खडी इ, गौण खनिजापोटीचे स्वामित्वधन संबंधित ठेकेदाराने भरलेलेच नसल्याची तक्रार ते अनेक वर्षांपासून शासनाकडे करीत आले होते. मात्र, ती रक्कम वसूल करण्यास वरिष्ठ पातळी वरून चालढकल केली जात होती. कोकण विभागीय आयुक्तांनी १८ जुलै रोजी पत्र देऊनही दंडाची रक्कम वसूल केली जात नसल्याने त्या व इतर मागण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्या नंतर महसूल विभाग कामाला लागला आहे. कोकण आयुक्तांनी या संबंधी चौकशी केल्या नंतर या कामासाठी पालघर, वाडा, भिवंडी या तालुक्यातील ६ लाख ७५ हजार ७४४ ब्रास माती, ३ लाख २१ हजार ९३६ ब्रास खडी,व २२ हजार ७८ ब्रास रेती वापरण्यात आल्याचे म्हटले आहे. या पैकी ठेकेदाराने १ लाख ८० हजार ब्रास माती व ४७ हजार १५० ब्रास खडीच्या स्वामित्वधनाची रक्कम सरकारकडे जमा केली आहे. तर ४ लाख ५३ हजार १४४ ब्रास माती, २ लाळ ७४ हजार ७८६ ब्रास खडी व २२ हजार ७८ ब्रास रेती इतक्या गौण खनिजाची रक्कम बुडविली आहे. या संदर्भातील चौकशी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे व पालघर यांनी कोणतीही माहिती सादर केली नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ शासनाची काट्यावधी रुपयाचे फसवणूक करण्यात सार्वजनिक बांधकाम ठाणे आणि पालघर विभागाचे अधिकारी सामील असल्याचे दिसून येत आहे.