‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:02 IST2025-07-17T14:01:05+5:302025-07-17T14:02:45+5:30

१० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान, यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे

super swachh navi mumbai now ranks higher than the regular ranking of clean cities in swachh survekshan 2024 | ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’

नवी मुंबई: शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणा-या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी यादृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ पर्यंत जी शहरे लागोपाठ ३ वर्षे किमान २ वेळा टॉप थ्री मध्ये आहेत अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये १० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे. 

नवी मुंबईच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री ना.श्रीम.माधुरी मिसाळ व नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्विकारला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. नवी मुंबईचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणा-या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये होणे ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचीही शान उंचाविली असल्याचा आनंद व्यक्त केला.

सुपर स्वच्छ लीग मधील ऐतिहासिक मानांकनाचे श्रेय सर्वांचे – आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे प्रतिपादन

नवी मुंबई शहराच्या या स्वच्छ सर्वेक्षणातील ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील समावेशाचे व त्यामधील उच्च मानांकनाचे श्रेय आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, नरेश म्हस्के, मंदाताई म्हात्रे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, स्वच्छ नवी मुंबईचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन, पद्मश्री अच्युत पालव, शुभम वनमाळी यांचा पाठींबा, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी आणि सफाईमित्र तसेच महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंद, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व मंडळे, महिला संस्था व मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटना, तृतीयपंथी नागरिक, पत्रकार, शिक्षक व प्रामुख्याने एनएसएस, एनसीसी व सर्व उत्साही विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्व घटकांचा सक्रिय सहभाग यांना दिलेले आहे.

Web Title: super swachh navi mumbai now ranks higher than the regular ranking of clean cities in swachh survekshan 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.