Success to the efforts of the Corona Warriors; 1248 corona free | कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश; १२४८ जण कोरोनामुक्त

कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश; १२४८ जण कोरोनामुक्त

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेसह शासन यंत्रणा सलग ७९ दिवस अविश्रांत कोरोनाशी लढा देत आहे. कोरोना योद्ध्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून आतापर्यंत तब्बल १,२४८ जणांना बरे करण्यात यश आले आहे. उपचार पूर्ण झालेले अनेक जण पूर्ववत कर्तव्यावर हजरही होऊ लागले असून आजाराविषयी नागरिकांमधील भीती कमी होत आहे.


नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्यामुळे शहरात खळबळ उडाली. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे डॉक्टर्स, नर्स, बेस्ट बस वाहक, व्यवसायिक यांना कोरोनाची लागण होऊ लागली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बघता बघता नवी मुंबईमध्ये कोरोनाने दोन हजारचा आकडा ओलांडला आहे. प्रतिदिन वाढणाऱ्या आकड्यांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


महानगरपालिका प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने पावले उचलून चार स्तरीय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. महानगरपालिका रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली. १३ मार्चपासून एकही दिवस सुट्टी न घेता अनेक अधिकारी व कर्मचारी अविश्रांतपणे परिश्रम घेत आहेत. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. नवी मुंबईमधील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.


वाढणाºया रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणारांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी सर्वाधिक २७७ रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल ५८ टक्के रुग्ण बरे झाले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या आता जास्त झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने ७९ दिवसांमध्ये साडेअकरा हजार नागरिकांची तपासणी केली आहे. यामध्ये साडेआठ हजार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २८ हजारपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यापैकी २० हजार ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. बरे होणाºयांची संख्या वाढू लागल्यामुळे नागरिकांचे मनोबलही वाढू लागले आहे.


७९ दिवस अविश्रांत मेहनत
1नवी मुंबई महापालिकेमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून ७९ दिवस महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्य आरोग्य अधिकारी, साथ नियंत्रण अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, सफाई व इतर कामगार अविश्रांतपणे काम करीत आहेत. अनेक जण साप्ताहिक सुट्टी न घेता काम करीत असून या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे.
मनोबल वाढले
2वाढणाºया रुग्णांपेक्षा बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे महानगरपालिका, पोलीस व इतर सर्वच शासकीय यंत्रणांसह शहरवासीयांचेही मनोबल वाढू लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनामुक्त झालेले कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. अशाच पद्धतीने प्रयत्न सुरू झाल्यास लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून दिलेल्या नियमावलीची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

बाधितांप्रति नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन
यापूर्वी क्वॉरंटाइन झालेल्यांकडेही दूषित नजरेने पाहिले जात होते. परंतु महानगरपालिकेने केलेली जनजागृती व केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. येणाºया काळात रुग्ण बरे होण्याची संख्या अजून झपाट्याने वाढून नवी मुंबई लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून या लढ्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

Web Title: Success to the efforts of the Corona Warriors; 1248 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.