बलात्कार प्रकरणातील दोषारोपपत्र सादर

By Admin | Updated: March 23, 2017 01:42 IST2017-03-23T01:42:31+5:302017-03-23T01:42:31+5:30

विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार नेरुळ पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.

Submit the chargesheet in the rape case | बलात्कार प्रकरणातील दोषारोपपत्र सादर

बलात्कार प्रकरणातील दोषारोपपत्र सादर

नवी मुंबई : विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार नेरुळ पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. सखोल तपासांती डीएनएच्या अहवालासह ते पोलिसांनी न्यायालयापुढे मांडले आहे; परंतु शिक्षकाच्या डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्या शिक्षकाप्रति न्यायालय काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेरुळ येथील एमजीएम विद्यालयातील १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे दाखल आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार त्याच शाळेतील राज शुक्ला या शिक्षकाला डिसेंबर महिन्यात अटक करण्यात आली आहे. शिवाय राजकीय हस्तक्षेपामुळे एका सहायक पोलीस निरीक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असता, पोलिसांनी शुक्ला याची डीएनए चाचणी घेतली होती. बलात्कारानंतर विद्यार्थिनी गरोदर राहिली असता, गर्भपातावेळी गर्भाचाही डीएनए घेण्यात आलेला आहे. या गर्भाच्या व शुक्लाच्या डीएनएत साम्य आहे का? हे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल गतमहिन्यात पोलिसांना प्राप्त झाला असून तो नकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अहवालासह पोलिसांनी संपूर्ण घटनेत केलेल्या तपासांती बनवलेले दोषारोप पत्र न्यायालयापुढे सादर केले आहे. त्यानुसार हा खटला निकाली काढण्यासाठी लवकरच पटलावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह शिक्षकांच्याही कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे. शुक्ला दोषी नसल्याचे घटनेच्या सुरुवातीपासून त्याच्या कुटुंबीयांचे म्हणने आहे. त्यांनी अटकेपूर्वीच पोलीस उपआयुक्तांकडे अर्ज देऊन स्वत: डीएनए चाचणीची मागणीही केली होती; परंतु नेरुळ पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला राजकीय वळण लागले होते.
शुक्लाचा डीएनए नकारात्मक आल्यामुळे नेमके दोषी कोण? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे; परंतु अद्यापपर्यंत झालेला तपास न्यायालयाच्या निर्देशाने झाला असल्याने यापुढील तपासात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Submit the chargesheet in the rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.