विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:21 IST2019-06-17T23:21:01+5:302019-06-17T23:21:12+5:30
कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे
कर्जत : कर्जतसारख्या शैक्षणिक हब बनत असलेल्या तालुक्यातील विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तम गुण मिळवीत आहेत. त्या विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, मात्र त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले. कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने दहिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
तटकरे म्हणाले, कर्जत तालुक्यातील आमदार सुरेश लाड यांनी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याची २० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. मधल्या काळात पाच वर्षे सुरेश लाड हे आमदार देखील नव्हते. मात्र विद्यार्र्थ्यांचे कौतुक करण्याच्या कार्यक्रमात कधी खंड पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय, यावर मार्गदर्शन मेळावेही आयोजित करण्यात येत आहेत.
कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये येत आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे आणि पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावे, मात्र परदेशात शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्या देशात येऊन देशाचा आलेख कसा उंचावेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ कार्यकर्ते वि. रा. देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, अजय सावंत, रजनी गायकवाड, कांगणे, स्मिता पतंगे, हिराताई दुबे आदी प्रमुख उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा तसेच १०० टक्के निकाल लागलेल्या चार माध्यमिक शाळांचा विशेष सत्कार करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत ९ कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.