एलएलएम सीईटी मराठीतून घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह

By Admin | Updated: May 26, 2017 00:28 IST2017-05-26T00:28:40+5:302017-05-26T00:28:40+5:30

एलएलएम अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर अर्ज करतात. त्यांच्या सोयीसाठी ही सीईटी मराठीतून घेण्याची गरज आहे

Students insist on taking LL.M. CET from Marathi | एलएलएम सीईटी मराठीतून घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह

एलएलएम सीईटी मराठीतून घेण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह

प्राची सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एलएलएम अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर अर्ज करतात. त्यांच्या सोयीसाठी ही सीईटी मराठीतून घेण्याची गरज आहे. शिवाय एलएलएम अभ्यासक्रम इंग्रजीमधून शिकवला जात असला तरी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका मराठी भाषेतून लिहिण्याची मुभा दिली जात असताना प्रवेशाकरिता घेण्यात येणारी सीईटी इंग्रजीतून का द्यावी, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. याबाबत कुलगुरूंना रीतसर पत्र सादर करण्यात आले आहे.
येत्या ३ जून रोजी एलएलएम प्रवेशाकरिता सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता अर्जाची मुदत संपली असून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटाचेही वाटप करण्यात आले आहे. सीईटीचे यंदाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे. कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये उपलब्ध करिअरच्या संधी पाहता या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबई विद्यापीठाकडे एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ६०० जागांसाठी तब्बल २ हजार ८०२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एलएलएम सीईटीसाठी फक्त १७०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र यावर्षी ही संख्या हजारांनी वाढली आहे. लॉ अभ्यासक्रमाकडे वाढत असलेला हा कल प्रामुख्याने उपलब्ध झालेल्या नोकऱ्यांच्या पर्यायांमुळे असल्याचे बोलले जात आहे. लॉ शाखेत मास्टर्स कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एलएलएम करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमामुळे सध्या तरी जागा वाढवणे शक्य नाही. यासाठी कॉलेज स्तरावर हा कोर्स सुरू करण्याची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या लॉ अ‍ॅकॅडमीचे डॉ. अशोक येंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Students insist on taking LL.M. CET from Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.