नवी मुंबईत मराठा जोडो अंतर्गत संघर्ष यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:11 IST2020-11-23T00:11:01+5:302020-11-23T00:11:23+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून चौकसभा; शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

नवी मुंबईत मराठा जोडो अंतर्गत संघर्ष यात्रा
नवी मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने केली जात आहेत. राज्यातील विविध भागांत मराठा जोडो अंतर्गत आंदोलने, संघर्ष यात्रा होत आहेत. रविवारी २२ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई शहरात सहा ठिकाणी चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली त्यानंतर कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, कळवा आणि नेरूळ येथे चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी न करण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. चौकसभेच्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जास्त असल्याचा आरोप करीत आरक्षणाचा प्रश्न लवकर न सोडविल्यास समाजाच्या न्यायासाठी येत्या काळात आक्रमकपणे मोर्चे काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. मराठा जोडो आंदोलन हे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देत राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, विनोद साबळे, वीरेंद्र पवार, दिलीप जगताप, विनोद पार्टे, नीलेश बाणखिले, ॲड. राहुल पवार, बाळासाहेब शिंदे, गणेश गायकवाड, दत्त फडतरे, चेतन खांडे, गणेश माने, गणेश भोसले, मारुती निकम आदी समन्वयक उपस्थित होते.