पनवेल पालिका क्षेत्रात जोरदार बॅनरबाजी

By Admin | Updated: March 20, 2017 02:22 IST2017-03-20T02:22:31+5:302017-03-20T02:22:31+5:30

महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळाबाबत सर्वच राजकीय पदाधिकारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर

Strong banner in the area of ​​Panvel municipality | पनवेल पालिका क्षेत्रात जोरदार बॅनरबाजी

पनवेल पालिका क्षेत्रात जोरदार बॅनरबाजी

पनवेल : महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदारयाद्यांमध्ये घोळाबाबत सर्वच राजकीय पदाधिकारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन पुनर्पडताळणीसाठी निवेदन देत आहेत. विशेष म्हणजे, मतदारयाद्यांचा घोळ सावरण्याचा प्रयत्न करीत राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध शक्कल लढवत आहेत. त्या दृष्टीने पालिका क्षेत्रात बॅनरबाजी सुरू झाली आहे.
शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पक्ष यात आघाडीवर आहेत. विशेषत: या बॅनरबाजीवरून शेकाप मेट्रोपोलिटन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. पहिल्यांदाच शेकाप हिंदी, इंग्रजी आशयाचे बॅनर्स छापून शहरी मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. खारघर हिरानंदानी उड्डाणपुलावर हे बॅनर सहज नजरेस पडतात.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर ग्रामीण भागात शेकापचे वर्चस्व असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, या पलीकडे जाऊन महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेकापने हिंदी, इंग्रजी बॅनर्स छापून शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी लावले आहेत. तर भाजपाने पनवेलमध्ये मोदी, फडणवीस यांच्या फोटोचा वापर करून पक्षाची कार्यपद्धती बॅनर्समधून मांडली आहे.
पनवेल महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून, महापालिका क्षेत्रात खारघर, कामोठे, कळंबोली या सिडको नोडचा समावेश आहे. खारघर नोडमध्ये मोठ्या प्रमाणात शहरी मतदार आहेत. देशातील विविध भागांतून आलेल्या या मेट्रोपॉलिटन मतदारांना शेकापक्षाबद्दल जास्त माहिती नाही. राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाला पसंती देणाऱ्या या मतदारांपर्यंत आपण पोहोचलो, तर पालिकेवर शेकाप आघाडीचा झेंडा नक्कीच फडकेल, हे शेकाप नेत्यांना माहीत असल्याने त्यांनी ही रणनीती आखली आहे.
पनवेलमध्ये लावण्यात आलेल्या बॅनर्समध्ये शेकाप जिल्ह्यात कशाप्रकारे नंबर वन आहे, हे बॅनर्समधून दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पनवेलमधील दिवसाआड पाण्याची समस्या, हे ठळकपणे बॅनर्सद्वारे दाखविण्यात आले आहे. भाजपानेही ‘केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा तसेच पनवेल महानगरपालिकेतही येणार भाजपा’ अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत.
नजीकच्या काळात सुरू असलेले बॅनर्स युद्ध आणखीनच तीव्र होणार आहे. दोन्हीही पक्षांतून अद्याप उमेदवारांची घोषणा केली गेली नसल्याने अनेक इच्छुक तिकिटाची आस लावून बसले आहेत.
नवीन पनवेलमधील शेकापचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेलमधील नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी स्वत:च्या प्रचारार्थ शहरात मोठमोठे फ्लेक्स लावण्यास सुरु वात केली आहे. शेतकरी, कामगार वर्गाचा असलेला पक्ष म्हणून ही ओळख पुसून सर्वच स्तरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा या उमेदवारांचा प्रयत्न असून, तशाप्रकारची चळवळच उभारण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
खांदा वसाहतीत इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच
अरुणकुमार मेहत्रे / कळंबोली
खांदा वसाहतीचा समावेश असणाऱ्या प्रभाग १५मध्ये भारतीय जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात खरी लढत होणार आहे. शेकाप आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने नेमके तिकीट कोणाला मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
शेतकरी कामगार पक्षाकडून माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांना खुल्या प्रवर्गातून रिंगणात उतरविण्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत विजय काळे यांच्या मातोश्री कुसुम काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. आरपीआयमधून शेकापक्षात आलेले मोहन गायकवाड भाजपाचे एकनाथ गायकवाड यांच्याबरोबर अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या जागेत दोन हात करणार आहेत. गायकवाड वगळता भाजपामधून अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. सर्वसाधारण जागेवर संजय भोपी यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, माजी नगरसेवक गणेश पाटील येथे दावा सांगून आहेत. सद्यस्थितीला भोपी यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. भीमराव पोवार आणि बीड येथील पार्श्वभूमी असणारे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे श्रीहरी मिसाळ यांची निवडणूक लढविण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. ओबीसी महिलांकरिता राखीव असलेल्या जागेवर माजी नगरसेविका सीता पाटील दावा सांगत आहेत. तर पोवार यांच्या पत्नी राजश्री यांना सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय माजी नगरसेविका मंगला राणे यांचे नावही चर्चेत आहे. शिवसेनेकडून उपशहरप्रमुख सदानंद शिर्के यांचे नाव पुढे आले आहे. त्याचबरोबर शहरप्रमुख लीलाधर भोईर यांच्या पत्नीला ओबीसी राखीव जागेतून निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. बाकी राखीव जागांसाठी धनुष्यबाणाचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अ‍ॅड. संतोष सरगर यांचे नाव निश्चित झाले आहे. त्याचबरोबर परिवर्तन सामाजिक संस्थेकडूनही महादेव वाघमारे पॅनल टाकण्याच्या तयारीत आहेत. खांदा वसाहतीत मोठ्या प्रमाणात कॉस्मोपॉलिटन मतदारांचा भरणा आहे. विशेष करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून उमेदवार ठरवले जात आहेत.

Web Title: Strong banner in the area of ​​Panvel municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.