अवैध व्यापार वाचविण्यासाठी धडपड सुरू
By Admin | Updated: May 29, 2017 06:44 IST2017-05-29T06:44:49+5:302017-05-29T06:44:49+5:30
बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या अवैध व्यापाराविरोधात लोकमतने आवाज उठविताच खळबळ

अवैध व्यापार वाचविण्यासाठी धडपड सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या अवैध व्यापाराविरोधात लोकमतने आवाज उठविताच खळबळ उडाली आहे. अवैध व्यापाऱ्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेण्यास सुरवात केली आहे. शनिवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनाही विरोध केल्याचे निदर्शनास आले आहे.
कांदा - बटाट्याचा व्यापार करण्यासाठी एपीएमसीने स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. परंतु काही व्यापाऱ्यांनी भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर व विस्तारित व जुन्या मार्केटच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेवर अवैध व्यापार सुरू केला आहे. रोडवरच कांदा-बटाटा व इतर वस्तू खाली करून त्यांची विक्री केली जात आहे. रोज रोडवरील व्यापारातून ५० लाखपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. पदपथ व रोडवर माल उतरविल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही वाहतूक पोलीस संबंधितांवर काहीही कारवाई करत नाहीत. तुर्भे विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकानेही या व्यापाराला अभय दिले आहे. रोज रोड व पदपथ अडविणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर काहीही कारवाई केली जात नाही. बाजार समितीचे प्रशासनही कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी लोकमतकडे तक्रारी केल्या होत्या. याविषयी वृत्त प्रसिद्ध करताच एपीएमसीने कारवाईसाठी तगादा सुरू केला असून विक्रेत्यांनी अवैध व्यापाराला अभय मिळावे यासाठी वशिलेबाजी सुरू केली आहे.
अवैध व्यापार सुरू करण्यासाठी यापूर्वी ज्यांनी पैसे घेतले व महापालिका, वाहतूक पोलिसांसह एपीएमसी प्रशासनाला कारवाई थांबविण्यासाठी मध्यस्थी केली त्यांच्याकडे जावून गाऱ्हाणी मांडली जात आहेत. याशिवाय प्रत्यक्षात अधिकाऱ्यांची भेट घेवून व्यवसाय वाचविण्याची धडपड सुरू झाली आहे. एपीएमसीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी प्रवेशद्वारावर जावून कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यापाऱ्यांनी कारवाईस विरोध दर्शविला.