क्रीडा संकुल बनले गर्दुल्ल्यांचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:23 IST2019-05-27T23:23:47+5:302019-05-27T23:23:56+5:30
उद्घाटनानंतरही वापरात नसल्याने जुईनगर येथील क्रीडा संकुलाची इमारत समस्यांनी ग्रासली आहे.

क्रीडा संकुल बनले गर्दुल्ल्यांचा अड्डा
नवी मुंबई : उद्घाटनानंतरही वापरात नसल्याने जुईनगर येथील क्रीडा संकुलाची इमारत समस्यांनी ग्रासली आहे. त्याठिकाणी रात्री अपरात्री गर्दुल्ल्यांच्या पार्ट्या रंगत असून, त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही वास्तू वापरासाठी खुली करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
नियोजनातील अभावामुळे पालिकेच्या वास्तू वापराविना पडून राहत असल्याचा प्रकार शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारात संबंधित वास्तू उभारण्यावर खर्च केल्या जाणाऱ्या कोट्यवधीच्या निधीचा अपव्यय होत आहे. अशाच प्रकारे पालिकेच्या वतीने जुईनगर येथे उभारण्यात आलेले क्रीडा संकुल गेल्या दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. सेक्टर २५ येथील गणेश मैदानामध्ये हे आंतरक्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. मात्र त्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे मागील दोन वर्षांपासून दिसून येत आहे.
क्रीडा संकुलाचे जुलै २०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर आजतागायत ते सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे अडगळीची जागा बनलेल्या या वास्तूच्या आवाराचा वापर समाजकंटकांकडून होत असल्याचे तिथल्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून दारूच्या बाटल्यांचा खचही त्यात पहायला मिळत आहे. रात्रीच्या वेळी मद्यपी, टवाळखोरांच्या टोळ्या जमलेल्या असतात. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा संताप मनसे शाखा अध्यक्ष अक्षय भोसले यांनी व्यक्त केला आहे. वापराविना पडीक असलेल्या पालिकेच्या वास्तूच्या आवारात ठाण मांडून बसणाºया समाजकंटकांमुळे परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तर भविष्यात या समाजकंटकांकडून त्याठिकाणी एखादा गैरप्रकार केला जाण्याच्या शक्यतेचीही भीती भोसले यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पंधरा दिवसात ही वास्तू वापरासाठी खुली करण्याची मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भातले पत्र त्यांनी पालिकेच्या मालमत्ता विभागाला दिले आहे, अन्यथा मनसेमार्फत ही वास्तू नागरिकांच्या वापरासाठी खुली करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
>समाजकंटकांकडून
वास्तूचा दुरुपयोग
पालिकेने आंतरक्रीडा संकुलासाठी सदर वास्तू उभारण्यात आली. मात्र त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे खेळ सुरू होऊ न शकल्याने ही वास्तू वापराविना पडून होती. यानंतर ती एका संस्थेला वारकऱ्यांच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर दिल्याचे समजते, परंतु सदर वास्तू प्रत्यक्षात वारकºयांऐवजी समाजकंटकांनाच उपयुक्त ठरत असल्याची टीका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.