भरधाव कारची स्कुल व्हॅनला धडक, दोन विद्यार्थी जखमी
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 18, 2023 22:20 IST2023-01-18T22:20:13+5:302023-01-18T22:20:23+5:30
सीवूडच्या रेल्वे पुलावरील घटना

भरधाव कारची स्कुल व्हॅनला धडक, दोन विद्यार्थी जखमी
नवी मुंबई : भरधाव कारच्या धडकेत स्कुल व्हॅन पलटी झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. यामध्ये दोन विद्यार्थ्यांना गंभीर तर इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीवूड येथील पोदार शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनसोबत हा अपघात झाला. व्हॅन चालक विशाल मोरे हे मंगळवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचे काम करत होते. त्यांची व्हॅन सीवूड येथील पुलावरून नेरुळ पूर्वेकडे चालली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने व्हॅनला जोराची धडक दिली.
यामध्ये व्हॅन पलटी झाली असता त्यामधील सृष्टी नोळे व आराध्य कदम दोघी गंभीर जखमी झाल्या. तर इतर चार विद्यार्थ्यांसह चालक मोरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार चालक हनान नूरानी अब्दुल अजीज (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.