विशेष मुलांचा ७ हजार राख्यांचा संकल्प
By Admin | Updated: July 6, 2017 06:26 IST2017-07-06T06:26:52+5:302017-07-06T06:26:52+5:30
गतिमंद मुले ही त्यांच्या पालकांना काही वेळेस एक समस्या वाटते. परंतु याच मुलांना सुयोग्य प्रशिक्षण दिले तर हीच मुले अनन्यसाधारण

विशेष मुलांचा ७ हजार राख्यांचा संकल्प
जयंत धुळप/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : गतिमंद मुले ही त्यांच्या पालकांना काही वेळेस एक समस्या वाटते. परंतु याच मुलांना सुयोग्य प्रशिक्षण दिले तर हीच मुले अनन्यसाधारण ठरू शकतात, हे पेण येथील आई डे केअर संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून शिकून आज स्वत:च्या पायावर उभे राहाण्याकरिता सिद्ध झालेल्या मुलांकडे पाहिल्यावर दिसून येते. प्रशिक्षणांती ही मुले अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या राख्या तयार करतात. गेल्या वर्षी त्यांनी पाच हजार राख्या तयार केल्या होत्या. यंदा आतापर्यंत ४ हजार ५०० राख्या तयार केल्या असून एकूण ७ हजार राख्या तयार करण्याचा संकल्प केला आहे.
आई डे केअरमधील मुलांचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता विविध संस्थांनी या राख्या खरेदी करुन मोठे सहकार्य केले आहे. त्यातून मुलांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वृद्धिंगत झाला आहे. पेण नगरपालिकेच्या नऊ प्राथमिक शाळा, आनंदशाळा, कारमेल हायस्कूल, केईएस प्राथमिक व माध्यमिक शाळा, सुमतीबाई देव प्राथ. शाळा, गुरु कुल हायस्कूल, पतंगराव कदम कॉलेज, मदर तेरेसा शाळा, प्रायव्हेट हायस्कूल, भाऊसाहेब नेने कॉलेज, सौ.म.ना.नेने कन्या विद्यालय, ट्रीहाऊस स्कूल, युरोकिड्स स्कूल, नवजीवन शाळा या पेणमधील संस्थांबरोबरच पनवेल येथील ड्यू ड्रॉप्स स्कूल व आपटे येथील होली स्पिरिट स्कूल या शाळा राख्यांच्या ग्राहक आहेत.
पेण एल.आय.सी.आॅफिस, पोस्ट आॅफिस, महावितरण आॅफिस, रोटरी क्लब आॅफ पेण, रोटरी क्लब आॅफ पेण ओरायन, रोटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब आॅफ पेण हिरकणी, इनरव्हील क्लब आॅफ पेण, अहिल्या महिला मंडळ, जिंदाल स्टील वर्क्स, हायकल लि. पनवेल, उत्तम गॅल्व्हा, आरसीएफ आणि नवजीवन ग्लोबल हेल्थ सेंटर, ठाणे व बोरीवली या संस्थाही राखीच्या ग्राहक असल्याचे आई डे
केअरच्याकार्यकारी संचालक स्वाती मोहिते यांनी सांगितले.
सुयोग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यास गतिमंद मुले काम करू शकतात, हे वास्तव अनुभवण्याकरिता संस्थेला भेट देण्याचे आवाहन आई डे के अर या संस्थेच्या वतीने करण्यात आले.
सुयोग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यास गतिमंद मुले काम करू शकतात, अर्थार्जन करू शकतात हे वास्तव अनुभवण्याकरिता संस्थेला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता ‘आपल्या सहकार्याचा हात पुढे करा, तो आम्ही राखीच्या प्रेमाने बांधून ठेवू!’ अशी मानसिकता या सर्व मुलांची असल्याचे यावेळी बोलताना संस्थेच्या मोहिते यांनी सांगितले.