सानपाड्यामधील खोकड तलावाचे होणार सुशोभीकरण
By Admin | Updated: March 21, 2017 02:15 IST2017-03-21T02:15:04+5:302017-03-21T02:15:04+5:30
तुर्भे विभागातील सानपाडा येथील खोकड तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तलावामधील

सानपाड्यामधील खोकड तलावाचे होणार सुशोभीकरण
नवी मुंबई : तुर्भे विभागातील सानपाडा येथील खोकड तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तलावामधील गाळ काढण्यात येणार असून यासाठी ६१ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने तलाव व्हिजनच्या माध्यमातून शहरातील बहुतांश तलावांचे सुशोभीकरण केले आहे. यानंतरही अनेक जुन्या तलावांचे सुशोभीकरण झालेले नव्हते. यामध्ये सानपाड्यामधील खोकड तलावाचाही समावेश आहे. तुर्भे पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या या तलावाचे सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या कामांमध्ये तलावामधील गाळ काढणे, पंपाने पाणी काढणे, सोलिंग करणे. पी. सी. सी. करणे, पोकलेन पुरविणे, पिचिंग करून घाट बांधणे, स्टील पुरविणे व इतर कामांचा समावेश आहे. या तलावाचा वापर गणेश विसर्जनासाठी केला जात आहे. सुशोभीकरण झाले नसल्याने तलावाचा स्थिती बिकट झाली असल्याने दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
खोकड तलावाच्या सुशोभीकरणासाठी सर्वसाधारण सभेने ६१ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे तुर्भे नाका व या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)