श्रमदानातून काढला तलावांतील गाळ
By Admin | Updated: May 29, 2017 06:30 IST2017-05-29T06:30:01+5:302017-05-29T06:30:01+5:30
किल्ले रायगडावरील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून गडावरील तलावातील गाळ काढण्याच्या

श्रमदानातून काढला तलावांतील गाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : किल्ले रायगडावरील पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी लोकसहभाग व श्रमदानातून गडावरील तलावातील गाळ काढण्याच्या कामास शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. या उपक्र मात संत निरंकारी मंडळासह काही स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांकडून किल्ले रायगडावरील तलावाची साफसफाई करण्याची मागणी होत होती.
किल्ले रायगडावरील पाण्याचा साठा संपल्याने जून महिन्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या शिवभक्तांची पाण्याची व्यवस्था करताना, प्रशासन व आयोजकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गडावरील सर्व तलावांतील पाण्याने तळ गाठल्याने या तलावांमधील गाळ काढून त्यांची खोली वाढविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. याकरिता सामाजिक संघटना व स्वयंसेवी संघटनांना श्रमदानासाठी कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संत निरंकारी मंडळ, महाडच्या ४० स्वयंसेवकांनी गंगासार तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. हा गाळ काढण्याचे काम आणखी ८ ते १० दिवस सुरू राहणार आहे.
महाड व आजूबाजूच्या तालुक्यांतील आठ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. किल्ले रायगडावरील हत्ती तलाव व गंगासार तलावातील गाळ उपसला जाणार असल्याने, गडावरील पाण्याचा साठा वाढणार आहे.