Six workers suffer due Gas leak, questioning workers' safety | वायुगळतीचा सहा कामगारांना त्रास, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
वायुगळतीचा सहा कामगारांना त्रास, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

धाटाव : धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी प्रदूषणाचे थैमान घातले असतानाच कंपनीअंतर्गतअपघाताची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कोरस इंडिया कंपनीमध्ये सहा कामगारांना वायुगळतीचा त्रास झाल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

कंपनीच्या पाच नंबर प्लॉटमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना सहा कामगारांना वायुगळतीमुळे त्रास झाला. कंत्राटी व कायम अशा सहा कामगारांना वायुबाधा झाली आहे. सर्वांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपन्यांमधून कामगारांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना घेतल्या जात नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, त्यामुळे कामगारांमध्ये घबराट पसरली आहे.

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील दुसऱ्या पाळीतील कामगार प्लॉट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्या वेळी निर्माण झालेल्या अ‍ॅसिटॉन या वायूच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याने प्रकृती खालावली. यामध्ये म्हाबीर टुडू (२४, रा. उत्तरप्रदेश), सुनील शाव (३१, रा. उत्तरप्रदेश), चंद्रकांत ढउल (५६, रा. भवन), प्रवीण साबळे (३२, रा. धाटाव), तुषार काफरे (३०, रा. रोहा) निखिल सुर्वे (३८, रा. रोहा) या कायम व कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. एक कामगार अत्यवस्थ असून, पनवेल येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर कामगारांच्या प्रकृतीत स्थिर आहे. कंपनीत नेमकी कशामुळे वायुगळती झाली याचा तपास सुरू असल्याची माहिती कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकांनी दिली. कोरस कंपनीवर आता पुन्हा काय कारवाई होणार, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Six workers suffer due Gas leak, questioning workers' safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.