सहा हजार स्कूल बस चालकांना फटका; एप्रिलपासून शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:36 IST2020-12-17T23:36:19+5:302020-12-17T23:36:24+5:30
कोरोनामुळे देशभरात केलेल्या लाॅकडाऊनचा परिणाम

सहा हजार स्कूल बस चालकांना फटका; एप्रिलपासून शाळा बंद
नवी मुंबई : लागू केलेल्या टाळेबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याची सर्वाधिक झळ स्कूल बसमालक आणि चालकांना बसली आहे. शाळा ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे शहरातील स्कूल बस मालक, चालक आणि कर्मचारी अशा सहा हजार जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सुमारे १000 बसेस आहेत. तर जवळपास पाचशे छोट्या व्हॅन आहेत. आर्थिक स्रोत बंद झाल्याने अनेक चालक, क्लीनर व साहाय्यक महिला यांचे रोजगार बंद झाले आहेत. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात काही बस मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन-तीन महिन्यांचे पगार दिले. परंतु कालावधी वाढल्याने त्यांनीही हात वर केले. परिणामी, अनेक चालक व वाहकांनी आपल्या मूळ गावी स्थलांतर केल्याचे बसमालक सांगतात.
नऊ महिन्यांपासून विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने बसेस व व्हॅन जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. अनेक वाहनांचे टायर, बॅटरी चोरीला गेल्या आहेत. काहींनी कर्ज काढून नवीन गाड्या घेतल्या होत्या. परंतु टाळेबंदीच्या काळात त्यांचेही हप्ते थकल्याने बसमालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
घर चालविण्यासाठी पडेल ते काम
शाळा ऑनलाइन सुरू असल्याने स्कूल बसेस बंद आहेत. त्यामुळे चालक व वाहक आपल्या मूळ गावी गेले आहेत. बसेस बंद असल्याने ते अद्याप परत आलेले नाहीत. तसेच बसमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी साहाय्यक म्हणून काम करणाऱ्या महिलांवरही बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. यातील अनेक महिलांवर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. परंतु त्यांचा रोजगारच हिरावल्याने त्यांच्यावर पडेल ती कामे करण्याची वेळ आली आहे. त्यानून अनेकांनी भाजीविक्री करायला सुरूवात केली आहे.
ताळेबंदीपासून गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. सुरुवातीच्या काळात कामगारांना तीन महिन्यांचा पगार दिला. परंतु बस मालकांचीच आर्थिक कोंडी झाल्याने कामगारांना सांभाळणे पुढे अवघड होऊन बसले. घरखर्चासह बँकांचे हप्ते, गाड्यांची देखभाल करताना बस मालकांची कसरत होत आहे.
- प्रवीण लोकरे , उपाध्यक्ष
बस ऑनर्स सेवा संस्था.
नवी मुंबईत ५०० स्कूल व्हॅन आहेत. ताळेबंदीपासून व्हॅन रस्त्यावर उभ्या आहेत. त्यामुळे त्या नादुरुस्त झाल्या आहेत. कोरोनाने उपजीविकेचे साधनच हिरावून घेतल्याने व्हॅन चालकांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाने व्हॅन चालकांना आर्थिक मदत करायला हवी.
- सुनील पाटील, अध्यक्ष, शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक सेवासंघ, नवी मुंबई
ताळेबंदीमुळे शाळा बंद झाल्याने बसेसही बंद झाल्या. परिणामी बेरोजगारीचे संकट ओढावले. त्यामुळे कुटुंबासह गावी आलो आहे. सध्या कोरोनाचे संकट ओसरताना दिसत आहे. परंतु शाळा सुरू होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे परत आल्यानंतर मिळेल ती गाडी चालविणे, हाच पर्याय उपलब्ध आहे.
- पांडुरंग ढमाले, स्कूल बस चालक
शाळा ऑनलाइन सुरू असल्याने स्कूल बसेस बंद आहेत. त्यामुळे आमच्या रोजगारावर गदा आली आहे. परिणामी मागील आठ महिन्यांपासून घरी बसून आहे. पैसे मिळविण्यासाठी भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून काही प्रमाणात घरखर्चाला हातभार लागत आहे.
- मंगला कदम, स्कूल बस सहायक