स्थायी समिती सभापतीपदी शुभांगी पाटील
By Admin | Updated: May 24, 2017 01:48 IST2017-05-24T01:48:10+5:302017-05-24T01:48:10+5:30
स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या ऋचा

स्थायी समिती सभापतीपदी शुभांगी पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या ऋचा पाटील यांचा ९ विरूद्ध ७ मतांनी पराभव केला. काँगे्रसने आघाडी धर्माचे पालन करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. गत वर्षीच्या पराभवाचा डाग पुसण्यात यश आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर फटाके वाजवून विजयाचा जल्लोष केला.
महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. गतवर्षी काँगे्रसच्या मीरा पाटील यांनी शिवसेनेला मतदान केल्याने व राष्ट्रवादीच्या एका सदस्याला मतदानाचा अधिकार नाकारल्याने स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे गेले होते. पुन्हा पराभवाची पुनरावृत्ती होवू नये यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सभापतीपदाचा उमेदवार ठरविण्यापासून काँग्रेसकडून पुन्हा बंडखोरी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. तुर्भे येथील नगरसेविका शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे शिवसेनेमध्ये सदस्य निवडीवरूनच दोन गट निर्माण झाल्याने सभापती पदाच्या निवडणुकीकडे पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी दुर्लक्ष केले. महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, आदींनी सभापतींचे अभिनंदन केले.