फुकट कोल्डड्रिंक नाकारल्याने दुकानदारावर वार, गुन्हेगारी टोळक्यांची परिसरात दहशत
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 20, 2023 16:04 IST2023-04-20T16:03:48+5:302023-04-20T16:04:08+5:30
घणसोली सेक्टर ५ येथे ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

फुकट कोल्डड्रिंक नाकारल्याने दुकानदारावर वार, गुन्हेगारी टोळक्यांची परिसरात दहशत
नवी मुंबई : फुकटात कोल्डड्रिंक देण्यास नकार दिल्याने दुकानदारावर वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चौघांवर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली सेक्टर ५ येथे ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश चौधरी यांचे त्याठिकाणी किराणा मालाचे दुकान आहे. सोमवारी सकाळी परिसरातल्या निलेश भालेराव याने चौधरी यांच्या दुकानातील फ्रिजमधून परस्पर चार कोल्डड्रिंक घेतल्या होत्या. मात्र त्याचे पैसे न देताच तो निघून जात असताना चौधरी यांनी त्याला अडवून त्याच्याकडील कोल्डड्रिंकच्या बाटल्या परत घेतल्या होत्या. याचा राग आल्याने निलेशने त्यांना धमकी दिली होती.
याच रागातून रात्रीच्या वेळी तो इतर तिघांसोबत त्याठिकाणी आला असता त्यांनी चौधरींना दुकानाबाहेर खेचून मारहाण करण्यास सुरवात केली. त्याचवेळी एकाने स्वतःकडे चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला असता परिसरातील नागरिक त्याठिकाणी धावून आले. यामुळे चौघांनीही पळ काढला असता जखमी चौधरींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेश भालेराव, नितीन भालेराव, विश्वदीप भोजने व राजू साठे यांच्यावर कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात अनेक गुन्हेगारी टोळ्या असून त्यांच्याकडून व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी केली आहे.