शांताबाई जाधव यांचे रेल्वे अपघातात निधन
By Admin | Updated: May 30, 2017 06:16 IST2017-05-30T06:16:04+5:302017-05-30T06:16:04+5:30
सर्वहारा जनआंदोलनाच्या आधारवड, उपेक्षित, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या

शांताबाई जाधव यांचे रेल्वे अपघातात निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : सर्वहारा जनआंदोलनाच्या आधारवड, उपेक्षित, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई जाधव (६२) यांचे शनिवारी सायंकाळी अष्टमी रोहा रेल्वे स्थानकाजवळील पटरीवर मांडवी एक्स्प्रेस रेल्वेच्या धडकेने जागीच निधन झाले. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच रोह्यासह रायगड जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्त्या जाधव यांच्या आकस्मिक जाण्याने विविध सेवाभावी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
समाजसेविका उल्का महाजन यांनी कार्यकर्त्या शांताबाई जाधव यांच्या रेल्वे अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला. शनिवारी सायंकाळी मडगाव रोहाकडून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस रेल्वेने शांताबाई जाधव यांना धडक दिली. त्या पटरी ओलांडून पिंगळसई गावाकडे जात होत्या. अचानक आलेली मांडवी एक्स्प्रेस जाधव यांच्या लक्षात आली नाही. त्या रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती रोहा पोलीस प्रशासनाने दिली. शांताबाई जाधव यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्वहारा आंदोलनाचे अध्यक्ष सोपान सुतार, चंद्रकांत गायकवाड, नथुराम वाघमारे, पांडुरंग वाघमारे, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
शांताबाई जाधव यांचा मृतदेह रोहा ग्रामीण रुग्णालयात आणला, मात्र रुग्णालयात शवविच्छेदनासाठी प्रमुख डॉक्टर हजर नव्हते, याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त झाला. तद्नंतर मृतदेह आंबेवाडी रुग्णालयात नेणार तोच त्याही रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे समजताच अखेर त्यांचा मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तिथेही शासकीय अनास्थेच्या कागदोपत्रांशी सामना करावा लागला. मृतदेह शासकीय प्रक्रियेसाठी अलिबाग, मुंबईला हलवावा असे सांगण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ससाणे रात्री अलिबाग बैठकीला गेले होते. अशा वेळी इतर सर्व अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला. याबाबत सर्वहाराचे अध्यक्ष सोपान सुतार यांनी संताप व्यक्त केला.