गृहकर्जाचे ४० लाख हडपून बापलेकाची केली फसवणूक, सात जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:52 IST2024-12-14T06:52:47+5:302024-12-14T06:52:55+5:30
जुईनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. त्यांना पैशांची गरज असल्याने ते गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

गृहकर्जाचे ४० लाख हडपून बापलेकाची केली फसवणूक, सात जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पैशांची गरज असलेल्या बापलेकाला गृहकर्ज मंजूर करून देऊन त्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांवर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अगोदरच कर्जात असलेल्या बापलेकावर नवे आर्थिक संकट कोसळले आहे.
जुईनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला. त्यांना पैशांची गरज असल्याने ते गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, बँकेकडून त्यांना कर्ज मिळत नसल्याने ते इतर वित्तसंस्थांकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांना घरावर कर्ज मिळवून देण्याची हमी दिली.
त्यांच्यावर विश्वास ठेवून बापलेकाने कर्जासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना स्वाक्षरी केलेली कागदपत्रे व धनादेश दिले होते. यानंतर काही दिवसातच त्यांना गृहकर्ज मंजूर झाले असून, त्याची रक्कम खात्यात जमा होताच धनादेशाद्वारे काढून घेतल्याचे निदर्शनात आले.
चौकशी करूनही प्रतिसाद नाही
याबाबत त्यांनी चौकशी केली असता कर्ज मिळवून देणाऱ्यांनी त्यांच्याकडील धनादेशाचे वापर करून ४० लाख रुपये स्वतःच्या वेगवगळ्या खात्यात जमा करून घेतले होते. याबाबत त्यांनी संबंधितांकडे चौकशी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून नेरूळ पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी अशाप्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का? याचीही अधिक चौकशी पोलिस करत आहेत.