CoronaVirus News : खारघर शहरातील नागरी वस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:25 IST2020-06-21T00:25:02+5:302020-06-21T00:25:34+5:30

खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Separation Center for Prisoners in Kharghar | CoronaVirus News : खारघर शहरातील नागरी वस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र

CoronaVirus News : खारघर शहरातील नागरी वस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र

पनवेल: खारघरमधील गोखले शाळेत केलेल्या विलगीकरण केंद्रात तळोजा कारागृहातील सुमारे २०० पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थर रोड कारागृहात झालेल्या कोरोनाच्या शिरकावाच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, रहदारीच्या व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी कैद्यांना ठेवण्यात आल्याने, मनसेने आक्रमक भूमिका घेत या विलगीकरण केंद्राला इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे.
खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता २,१२४ असून, सध्या कारागृहात दोन हजारांहून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. एप्रिल महिन्यात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सावध भूमिका घेत, नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी खारघरमधील गोखले शाळेत विलगीकरण केंद्राची निर्मिती केली. सुरुवातीला केवळ २० कैदी होते. त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली असून, सध्या २०० हून अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०० कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ ११ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात दिवसा पाच, तर रात्रपाळीसाठी सहा पोलिसांची नेमणूक करण्यात आल्याचे समजले, तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे चार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शाळेच्या सर्व खोल्या कैद्यांनी भरल्या आहेत. खारघर शहरातील गोखले शाळा हे ठिकाण सेक्टर १२ मधील रहदारीच्या व दाट लोकवस्तीचे असल्याने या ठिकाणी नागरिकांची मोठी लोकवस्ती असल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कैद्यांना इतरत्र हलविण्याची मागणी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मनसेने शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
कारागृह प्रशासनामार्फत कैद्यांना खारघर शहरातील गोखले शाळेत विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पालिका प्रशासनाचे यामध्ये कोणतेही हस्तक्षेप नसल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
>खारघर शहरात शहराच्या अवतीभोवती कैद्यांना ठेवण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध असताना अशाप्रकारे शहराच्या मध्यभागी दाट लोकवस्तीत कैद्यांचे विलगीकरण केंद्र स्थापन करणे चुकीचे आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने याचा त्रास येथील रहिवाशांना सहन करावा लागू शकतो. याकरिता हे विलगीकरण केंद्राचे इतरत्र स्थलांतर करावे, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे.
- प्रसाद परब (मनसे, खारघर शहर अध्यक्ष)

Web Title: Separation Center for Prisoners in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.