प्रबोधनकारांच्या जन्मभूमीत सेनेला भोपळा
By Admin | Updated: May 28, 2017 03:27 IST2017-05-28T03:27:38+5:302017-05-28T03:27:38+5:30
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जन्मभूमीमध्येच शिवसेनेला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. संघटनात्मक बांधणी करण्याकडे केलेले दुर्लक्ष व स्थानिक

प्रबोधनकारांच्या जन्मभूमीत सेनेला भोपळा
नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जन्मभूमीमध्येच शिवसेनेला दारुण पराभवास सामोरे जावे लागले आहे. संघटनात्मक बांधणी करण्याकडे केलेले दुर्लक्ष व स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याने स्वबळाचा अट्टहास धरणाऱ्या पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभाही निष्फळ ठरली असून, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व पक्षाचे सचिव आदेश बांदेकर ठाण मांडून बसल्यानंतरही मतदारांवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भाजपाला रोखण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती. सर्वच विरोधी पक्ष एकवटल्याने भाजपाने शिवसेनेला बरोबर घेण्याची तयारी दर्शविली होती. ७८ पैकी २० जागा देण्याची मानसिक तयारीही सुरू केली होती. शिवसेनेची तालुक्यात संघटनात्मक बांधणीच नसल्याने या जागाही जास्त असल्याचे जाणकारांचे म्हणणे होते; परंतु शिवसेनेने जागांचा आकडा वाढवून मागितला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा जाहीर करण्यात आली. भाजपाला रोखण्यासाठीच शेकापच्या सांगण्यावरून युती केली नसल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. शिवसेनेच्या नेत्यांनी हे आरोप खोडण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा शिवसेनेने केली; परंतु प्रत्यक्षात त्यांना ७८ उमेदवारही उभे करता आले नाहीत. स्थानिक नेतृत्वामध्ये गटबाजी असल्याने निवडणुकीच्या तोंडावरच राजीनामा सत्र सुरू झाले होते. पक्षाचे सचिव व ‘होमनिस्टर’ फेम आदेश बांदेकर यांनी त्यांच्या लोकप्रियतेचा पुरेपूर उपयोग करून शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आदेश भाऊजी ज्या प्रभागामध्ये प्रचाराला जायचे तेथे नागरिक विशेषत: महिला प्रचंड गर्दी करत होत्या. त्यांच्या रॅलीलाही प्रचंड गर्दी होत होती. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठीही गर्दी होऊ लागली होती; परंतु यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता. बांदेकर यांच्या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड असल्यानेच ही गर्दी होऊ लागली होती. आदेश बांदेकर आपल्या प्रभागात आलाच आहे, तर भेटून घेऊ, एवढाच भाग त्यामध्ये होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: पनवेलमध्ये तळ ठोकून होते. पक्षाचे सर्व प्रमुख नेते या परिसरात प्रचाराला आले होते. पक्षाचे उपनेते व व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचीही सभा पनवेलमध्ये ठेवण्यात आली होती. प्रत्येक प्रभाग पिंजून काढण्यात आला; पण त्याचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नाही. भाजपाने दिलेल्या २० जागा नाकारलेल्या शिवसेनेला स्वबळावर एकही जागा जिंकता आली नाही. पराभवास सामोरे जावे लागले असून कार्यकर्त्यांचे मनोबलही खचले आहे.
शिवसैनिकांची फौज बिनकामाची
पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. पक्षाचे नेते, नगरसेवक, पदाधिकारी पनवेलमध्ये तळ ठोकून होते; पण पूर्ण नवी मुंबईची शिवसेना पनवेलमध्ये एकही प्रभागात पक्षाचा उमेदवार निवडून आणू शकलेली नाही. यापूर्वी गोवा येथे प्रचाराला गेलेल्या नवी मुंबईकर शिवसैनिकांना अशाच अपयशाला सामोरे जावे लागले होते. नवी मुंबईमधील शिवसैनिकांची फौज पनवेलकरांच्या दृष्टीने बिनकामाचीच ठरली आहे.
फक्त निवडणुकीलाच नेते येतात
पनवेलमध्ये निवडणुका आल्या की शिवसेनेचे नेते येतात. निवडणुका संपल्या की गायब होतात ते पुन्हा दुसऱ्या निवडणुकीलाच येतात. पक्षाला सक्षम स्थानिक नेतृत्वच नाही. शेतकरी कामगार पक्ष, भाजपा पक्षबांधणीसाठी परिश्रम घेतात; पण शिवसेनेमध्ये ते प्रयत्न दिसत नसल्याने फक्त निवडणुकीसाठी आलेल्या नेत्यांना पनवेलकरांनी नाकारले आहे.
शिवसेनेचे दुर्दैव
पनवेल आणि शिवसेना यांचे भावनिक नाते आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे पनवेल हे जन्मस्थळ. यामुळे शिवसेना प्रमुखांनाही पनवेलविषयी विशेष अस्था होती. प्रचारामध्येही उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता; परंतु प्रबोधनकारांच्या जन्मभूमीमध्ये एकही जागा जिंकता आली नाही, हे पक्षाचे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त केले जाऊ लागले आहे.
खासदारांचा प्रभाव नाही
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे आहेत. तीन वर्षांमध्ये पनवेलचा एकही महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सोडविलेला नाही.
पनवेलमधील पक्षबांधणीकडेही त्यांनी लक्ष दिले नाही. याचा मोठा फटका शिवसेनेला बसला असून, हक्काचा खासदार असूनही पनवेलमध्ये शिवसेना वाढू शकली नाही.
उरणचे आमदार मनोहर भोईर हेही पनवेलमध्ये प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले असून, पक्षाचे रायगडचे नेते बबन पाटीलही एक उमेदवार जिंकून आणू शकले नाहीत.