सुरक्षारक्षक बोर्डाचीही केली फसवणूक
By Admin | Updated: December 21, 2015 01:34 IST2015-12-21T01:34:57+5:302015-12-21T01:34:57+5:30
सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून मराठी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सुरक्षारक्षक बोर्डाचीही केली फसवणूक
नामदेव मोरे, नवी मुंबई
सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून मराठी तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एजंटच मंडळाचे तोतया इन्स्पेक्टर बनल्याचे स्पष्ट झाले आहे. खोटी कागदपत्रे, शिक्के व अधिकाऱ्यांच्या सह्या करून बोर्डाचीही फसवणूक केली आहे.
सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणेमध्ये काम करणारा सुरक्षारक्षक एम. जी. मिश्रा याने मराठी तरुणांना फसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लोकमतने याविषयी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सुरक्षा मंडळामध्ये खळबळ उडाली आहे. फसविण्यात आलेले तरुण ज्या ठिकाणी काम करत होते तेथून सर्व माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिश्राचा ठावठिकाणा शोधण्यासही सुरवात झाली आहे. बोर्डाच्या नावाने खोटे नियुक्तीपत्र, बोर्डाचे शिक्के, अधिकाऱ्यांच्या सह्याही केल्या असल्याचे समोर आले आहे. याविषयी सुरक्षा मंडळाला यापूर्वीच कुणकुण लागली होती. परंतु कोणाचीही अधिकृत तक्रार नसल्यामुळे याविषयी गुन्हा दाखल केला नाही. सानपाडा पोलीस स्टेशनला बोर्डाच्या नावाचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार दिली होती. सुरक्षा मंडळामध्ये नोकरी लावणारे रॅकेट अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मंडळाच्या अखत्यारीत जवळपास २५०० कंपन्या आहेत. एखाद्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची आवश्यकता असेल तर परस्पर त्यांची नियुक्ती केली जात होती. यामधील एक रॅकेट मिश्रा चालवत आहे. त्याने सुरक्षारक्षक मंडळामध्ये एम. के. भोसले नावाचे इस्पेक्टर आहेत. ते आपले काम करून देत असल्याचे भासवत होता. भोसलेंच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून ते तरुणांना दिले जात आहे. त्यामध्ये सानपाडा कार्यालयाचा पत्ता व संपर्क नंबरही दिले आहेत.
मराठी तरुणांना दिलेले नियुक्ती पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणांना महानगर गॅस, सेबी, टाटा कन्सल्टन्सी, युनियन बँक, नानावटी रुग्णालयामध्ये नोकरीची जबाबदारी दिली होती. अजूनही काही कर्मचारी तेथे काम करत आहेत. वास्तविक एखाद्या खाजगी किंवा शासकीय आस्थापनाने सुरक्षारक्षकांची मागणी केल्यानंतर बोर्डाच्यावतीने त्यांना संबंधित ठिकाणी पाठविले जाते. कर्मचाऱ्यांनी चार ते पाच महिने काम केले. याचाच अर्थ त्यांच्या नावाने वेतनही बोर्डाकडे पाठविले असणार. मग सदर रक्कम परस्पर कुठे गेली असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एजंटने फक्त सुरक्षारक्षकांची व बोर्डाची फसवणूक केलेली
नाही तर सरकारी व खाजगी आस्थापनांचीही फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी बोर्डानेही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होवू लागली आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांची भरती बोर्डाने केली नसल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भरती करताना त्याविषयी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देत असते. तरुणांची शारीरिक, वैद्यकीय चाचणी, चारित्र्य पडताळणी करून अधिकृतपणे कार्यालयात नियुक्तीपत्र दिले जाते. ज्या तरुणांची फसवणूक झाली त्यांना कार्यालयात नियुक्तीपत्र दिलेले नाही. मिश्रा नावाच्या एजंटने बोर्डाच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आले. बोर्डाकडून जवळपास अडीच हजार सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत. एखाद्या ठिकाणी जागा कमी असेल तर तेथे या एजंटने खोटी कागदपत्रे देवून भरती केल्याची माहिती देण्यात आली.