परराज्यांतून येतोय निकृष्ट औषधसाठा
By Admin | Updated: January 25, 2015 01:15 IST2015-01-25T01:15:09+5:302015-01-25T01:15:09+5:30
महाराष्ट्रातील औषधी दुकानांमध्ये अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दर्जाहीन औषधी येत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

परराज्यांतून येतोय निकृष्ट औषधसाठा
श्रीनारायण तिवारी -मुंबई
महाराष्ट्रातील औषधी दुकानांमध्ये अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दर्जाहीन औषधी येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. परराज्यांतून आलेल्या औषधांपैकी सुमारे १२.२६ टक्के साठा ‘दर्जाहीन’ असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागासमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे़
सूत्रांच्या मते, सर्वाधिक निकृष्ट दर्जाचा औषध पुरवठा हिमाचल प्रदेशातून येत आहे. यानंतर उत्तराखंड व गुजरातचा क्रमांक लागतो. एफडीएने एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत संकलित केलेल्या नमुन्यांमध्ये हिमाचल प्रदेशातून आलेला औषध साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून आले आहे. हिमाचल प्रदेशातील १०५ औषधी निकृष्ट दर्जाची आढळली. याच प्रमाणे उत्तराखंडची ५० व गुजरातची ३० औषध नमुने दर्जाहीन असल्याचे निष्पन्न झाले.
एफडीएच्या मते, एप्रिल ते नोव्हेंबर या काळात अन्य राज्यांतील कंपन्यांचे एकूण १९७३ औषध नमुने गोळा केले होते. यात एफडीएच्या मापदंडानुसार, २४२ अर्थात १२.२६ टक्के नमूने निकृष्ट दर्जाची निघाली. यानंतर एफडीएने ही औषधी ‘सेवन करण्यास हानिकारक’ असल्याचे घोषित करुन यांचा साठा तात्काळ जप्त केला होता. यात हिमाचल प्रदेशचे १०५, उत्तराखंडचे ५०, गुजरातचे ३०, मध्यप्रदेशचे १३, आंध्र व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी ८, राजस्थानचे ५, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील प्रत्येकी २ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळून आले. दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मीर, चंदीगड आणि दीव व दमण येथे तयार झालेल्या औषधींपैकी प्रत्येकी १ नमुना दर्जाहीन असल्याचे दिसून आले.
औरंगाबाद, मुंबईत चाचणी
गोळा केलेल्या औषध नमुन्यांची मुंबई व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. फेरपडताळणीसाठी हे नमुने अन्यत्रही पाठवले होते. दोन्ही ठिकाणचे अहवाल सारखेच आले. एफडीएचे संयुक्त आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी यासंदर्भातील अडचणींची कबुली देत यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
औद्योगिक विकासात देशात ‘नंबर वन’ महाराष्ट्रातील औषध कंपन्यांही दर्जाहीन निर्मितीत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र तयार होत असलेल्या औषधींपैकी ७.१९ टक्के नमुने निकृष्ट आढळले.