शैक्षणिक साहित्य खरेदीमध्ये घोटाळा

By Admin | Updated: April 21, 2016 02:57 IST2016-04-21T02:57:34+5:302016-04-21T02:57:34+5:30

महापालिका पुढील दोन वर्षात गणवेश, दप्तर व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तब्बल ३३ कोटी ७० लाख रूपये खर्च करणार आहे.

Scandal in the purchase of educational materials | शैक्षणिक साहित्य खरेदीमध्ये घोटाळा

शैक्षणिक साहित्य खरेदीमध्ये घोटाळा

नवी मुंबई : महापालिका पुढील दोन वर्षात गणवेश, दप्तर व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तब्बल ३३ कोटी ७० लाख रूपये खर्च करणार आहे. याविषयीचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच साहित्य तयार झाले असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला असून दप्तर, रेनकोट सभागृहात दाखविल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिका प्रत्येक वर्षी गणवेश, बूट, मोजे, रेनकोट, वह्या, पी. टी. चा गणवेश व इतर साहित्य देत असते. प्रशासकीय दिरंगाईमुळे शालेय साहित्य वेळेत मिळत नाही. पुढील शैक्षणिक वर्षात वेळेत साहित्य मिळावे यासाठी एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी आणला होता. दोन वर्षासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी तब्बल ३३ कोटी ७० लाख २०,७५९ रूपये खर्च होणार आहेत. वास्तविक सर्वसाधारण सभेने विषय मंजूर केल्यानंतर निविदा मागविल्या जातात. निविदा सादर केल्यानंतर स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर ठेकेदाराला कार्यादेश दिला जातो. परंतु शैक्षणिक साहित्य खरेदीच्या प्रस्तावामध्ये प्रशासकीय मान्यतेपूर्वीच सर्व साहित्याची खरेदी झाली असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी केला आहे. साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून खरेदी करण्यात येणार असलेले दप्तर व रेनकोट त्यांनी सभागृहात दाखविला. महापालिकेचा लोगो असलेले हे साहित्य पाहून सभागृहात खळबळ उडाली. विरोधकांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य जादा पैसे देवून खरेदी केले जात असल्याचे त्यांनी पुराव्यासह सभागृहाला दाखविले.
महापालिकेने शैक्षणिक साहित्य कोणाकडून खरेदी करायचे हे अगोदरच ठरविले आहे. प्रशासकीय मंजुरी व निविदाची औपचारिकता पूर्ण केली जात असून या प्रक्रियेची चौकशी करावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही पाटकर यांनी दिला. मनोज हळदणकर यांनीही कालबाह्य झालेल्या आकाराचे दप्तर विद्यार्थ्यांना दिले जात आहे. रेनकोटही वापरण्यायोग्य नाही, असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी केलेल्या आरोपास प्रशासनाने उत्तर दिले नाही. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आरोप फेटाळून प्रस्ताव मंजुरीस ठेवला. (प्रतिनिधी)

Web Title: Scandal in the purchase of educational materials