एपीएमसी फळ मार्केटमध्ये गांजा विक्री
By Admin | Updated: July 30, 2016 04:44 IST2016-07-30T04:44:18+5:302016-07-30T04:44:18+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. येथील अमली

एपीएमसी फळ मार्केटमध्ये गांजा विक्री
- नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मार्केटमध्ये नवी मुंबईमधील सर्वात मोठा गांजा विक्रीचा अड्डा चालविला जात आहे. येथील अमली पदार्थ विक्रेत्यांनी तुर्भे, इंदिरानगर व इतर परिसरामध्येही दुकाने थाटली असून या अवैध व्यवसायाकडे बाजार समितीचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख होती. परंतु बाजार समिती प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे येथील फळ व भाजी मार्केट गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. मार्केटमध्ये दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना वास्तव्य करत आहेत. या कामगारांची कोणाकडेच नोंद नाही. ज्या व्यापाऱ्यांच्या गाळ्यात ते राहतात त्यांच्याकडेही त्यांची नावे व पत्ते उपलब्ध नाहीत.
मार्केटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाकडे बाजार समितीचा परवाना असणे आवश्यक असते. परंतु बाजार समितीकडेही या कामगारांची नोंद नाही. चोवीस तास मार्केटमध्ये ठाण मांडलेल्या या कामगारांमध्ये यापूर्वी बांगलादेशीही सापडले आहेत. दोन महिन्यापूर्वीही येथून बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामधील अनेक कामगारांना अमली पदार्थांचे व्यसन लागले आहे. त्यांना गांजा पुरविण्याचे दोन मोठे अड्डे तयार झाले आहेत. यामधील एक भाजी मार्केटच्या गेटच्या बाहेरील सार्वजनिक शौचालय व दुसरा फळ मार्केटच्या मागील गेटजवळील छोट्या अनधिकृत मंदिरामध्ये गांजा विकला जात आहे. १०० रुपयांना दहा ग्रॅमची पुडी विकली जात आहे.
‘लोकमत’च्या टीमने या ठिकाणी जावून गांजा खरेदी करून विक्रेत्यांशी संवाद साधला असता आमच्याकडे चोवीस तास गांजा मिळतो, असे सांगण्यात आले. मंदिराजवळ कोणालाही विचारले तरी ते आम्ही कुठे आहोत ते सांगतील, असे या विक्रेत्यांनी सांगितले. येथील राजू नावाचा विक्रेता गांजा पुरविण्याचे काम करत असून त्यानेच तुर्भेनाका व इंदिरानगरमध्ये गांजा विक्रीचे अड्डे सुरू केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
बाजार समितीच्या फळ मार्केटमधील सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत २५ पेक्षा जास्त पत्रे बाजार समिती प्रशासनाला दिली आहेत. मार्केटमध्ये विनापरवाना परप्रांतीय कामगार मुक्काम करत आहेत. यामध्ये वारंवार विदेशी नागरिक आढळून आले आहेत. अशीच स्थिती राहिली तर अतिरेकी कारवाई करणारेही मार्केटमध्ये आश्रय घेण्याची भीती व्यक्त केली आहे.
गुप्तचर विभागानेही मार्केटमध्ये देशविरोधी कारवाई करणाऱ्या व्यक्ती आश्रय घेवू शकतात असा अहवाल दिला आहे.
खुलेआम गांजाची विक्री
फळ मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून गांजा विक्री होत आहे. गांजा कोण विकते व कुठे विकला जातो हे मार्केटमधील सर्वांनाच माहीत आहे. फळ बाजाराच्या मागील बाजूला एपीएमसीचे दोन सुरक्षा रक्षक २४ तास बसलेले असतात. त्यांच्याच समोर गांजाची विक्री होत आहे. परंतु कोणीच आक्षेप घेत नाही. पोलीसही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दारूचे तीन अड्डे उद्ध्वस्त
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकून दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. रमेश कॉरीजवळ, श्रमिक नगर व इंदिरा नगर याठिकाणी हे अवैध दारूचे अड्डे चालत होते. याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सदर तिन्ही ठिकाणी छापा टाकून तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६५ बाटल्या अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.
परप्रांतीय कामगारांचे आश्रयस्थान
बाजार समितीच्या नियमाप्रमाणे मार्केटमध्ये काम करणारे व्यापारी, कामगार, वाहतूकदार व खरेदीदारांकडे मार्केट प्रवेशाचा परवाना असणे आवश्यक आहे. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार फळ बाजारामध्ये मुक्काम करत आहेत. अनेकजण मार्केटच्या बाहेर काम करतात परंतु रात्री मुक्कामाला येथे येत आहेत. यामधील अनेकजण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. शहरातील सर्वात जास्त गांजा विक्री या ठिकाणी होत असून विक्रेत्यांनी परप्रांतीय कामगारांना लक्ष्य केले आहे.
बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये कोणताही अवैध प्रकार होत असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. स्वत: मार्केटमधील स्थितीची पाहणी करणार असून चुकीच्या गोष्टी निदर्शनास येताच तत्काळ कारवाई केली जाईल.
- शिवाजी पहीनकर,
सचिव, एपीएमसी