रिक्षा-टॅक्सीचालकांच्या महामंडळाच्या कार्यपद्धतीचे नियम आठ दिवसांत
By नारायण जाधव | Updated: June 28, 2024 18:57 IST2024-06-28T18:57:38+5:302024-06-28T18:57:52+5:30
परिवहन सचिव संजय सेठी यांची माहिती : महामंडळास दिला ५० कोटींचा निधी

रिक्षा-टॅक्सीचालकांच्या महामंडळाच्या कार्यपद्धतीचे नियम आठ दिवसांत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी स्थापन केेलेल्या महामंडळास ५० कोटींचा निधी दिला असून येत्या आठ दिवसांत त्याच्या कार्यपद्धतीचे नियम बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी काहीही सूचना असल्यास त्या त्वरित परिवहन विभागास कळवाव्यात, असे आवाहन राज्याचे परिवहन सचिव संजय सेठी यांनी केले आहे.
नवी मुंबईतील रिक्षाचालकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत शहरातील १८ संघटनांच्या शिष्टमंडळाने शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली सेठी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
या भेटीदरम्यान रिक्षा पासिंग विलंब झाल्यास ठोठावण्यात येणाऱ्या प्रतिदिन ५० रुपये दंडाची रक्कम बरीच मोठी असल्यामुळे ती रक्कम माफ करावी/ कमी करावी / भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी. नवी मुंबईत 2५ हजारपेक्षा जास्त अधिकृत, अनधिकृत रिक्षा नवी मुंबईत आहेत. त्यामुळे व्यवसाय मिळत नाही. अशा परिस्थितीत नवीन परवाने पुढील तीन वर्षे बंद करावेत यासोबत अन्य विविध मागण्यांवर चर्चा झाली.
नवीन रिक्षा परवाने बंद करण्याबाबत धोरणात्मक निर्णय असून लवकरच संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन परिवहन सचिव यांनी दिले. रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत नाहटा यांनी मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करून सकारात्मक चर्चा घडवून आणल्याबद्दल रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, भरत नाईक, दिलीप आमले, मारुती कोंडे उपस्थित होते.