प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 11:26 PM2019-05-25T23:26:12+5:302019-05-25T23:26:20+5:30

प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे.

Roads in the city through plastic recycling | प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

प्लॅस्टिकच्या पुनर्प्रक्रियेतून शहरात रस्त्यांची निर्मिती

Next

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : प्लॅस्टिकच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अनुषंगाने पालिकेकडून रस्त्यांच्या कामात प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. राज्यात प्रथमच नवी मुंबईत हा उपक्रम राबवण्यात आल्यानंतर इतर महापालिकांनीही त्यात पुढाकार घेतला आहे, यामुळे डांबरीकरणाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचत होत असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.
प्लॅस्टिकचे सहज विघटन होत नसल्याने पुनर्वापर हाच त्यावर उपयुक्त पर्याय ठरत आहे. मात्र, यामुळेही प्लॅस्टिक दैनंदिन वापरात राहणार असल्याने त्याचा पर्यावरणाला धोका कायम राहणार आहे. त्यावर पर्याय म्हणून नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथमच रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर
करण्याचा उपक्रम हाती घेतला.
त्यानुसार तळवली येथे पहिल्यांदा त्या संकल्पनेतून रस्ता तयार करण्यात आला होता, यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारे रस्ते बनवण्याचे काम हाती घेण्यात आले.
पालिका क्षेत्रात जमा होणारा दररोजचा अनेक टन कचरा तुर्भेतील डम्पिंग ग्राउंडवर जमा केला जातो, त्यामध्ये प्लॅस्टिक कचºयाचेही प्रमाण अधिक असायचे. प्लॅस्टिकचा कचरा प्रक्रिया करून रस्त्यांच्या डांबरीकरणात वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महापे डेपोसमोरील मार्ग, घणसोली-कोपरखैरणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचा कोपरखैरणेकडील भाग, गोठीवली गावातील मार्ग आदीचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश रस्ते मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी बनवण्यात आले असून, अद्यापही ते सुस्थितीत आहेत. यावरून डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने रस्ते दीर्घकाळ टिकताना दिसत आहेत. परिणामी, प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या डागडुजीवर होणाºया खर्चाला कात्री बसली आहे.
>पर्यावरणाचा समतोल
प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याकरिता त्याचा रस्त्याच्या डांबरीकरणात वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिकेने हा उपक्रम हाती घेऊन मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या कचºयाचा पुनर्वापर केला.
डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने पर्यावरणाचीही हानी टळत आहे. प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या रसायनाचा डांबरात वापर होऊ लागल्याने डांबरीकरणावर होणाºया खर्चात दहा टक्क्यांची बचत झाली. दोन वर्षांपूर्वी बनवलेले प्लॅस्टिकचे रस्ते अद्यापही सुस्थितीत.
>शहरातील वाढत्या प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न भेडसावत होता, त्यावर पर्याय म्हणून रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे एकूण कामाच्या खर्चात दहा टक्क्यांची बचतही होत आहे. त्यानुसार प्रत्येक नोडमध्ये अशा प्रकारचे रस्ते बनवण्यात आले असून, यापुढेही काही रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.
- संजय देसाई, कार्यकारी अभियंता,
नवी मुंबई महापालिका.
>जुन्या-नव्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी होतोय वापर
प्लॅस्टिकच्या साठ्यावर प्रक्रिया करून तयार झालेले रसायन प्रत्यक्षात रस्त्याच्या डांबरीकरणा वेळी डांबरात मिसळले जाते, त्यामुळे प्लॅस्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे. शिवाय, डांबरीकरणाच्या कामावर होणाºया एकूण खर्चातही सुमारे दहा टक्क्यांची बचतही होऊ लागली आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत महापालिका क्षेत्रात १५ पेक्षा अधिक ठिकाणी डांबरात प्लॅस्टिकचा वापर करून नवे रस्ते अथवा जुन्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे.

Web Title: Roads in the city through plastic recycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.