खारघरमध्ये रस्ते झाले चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 23:21 IST2019-10-13T23:21:24+5:302019-10-13T23:21:45+5:30
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघरमध्ये १६ आॅक्टोबर रोजी प्रचारसभा होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू ...

खारघरमध्ये रस्ते झाले चकाचक
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खारघरमध्ये १६ आॅक्टोबर रोजी प्रचारसभा होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून सिडकोने अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.
खारघर, सेक्टर २२ मध्ये मोदींची सभा होणार आहे. पनवेलमध्ये भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील व नवी मुंबईतील भाजप मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. खारघर, कामोठे, तळोजे येथील रस्ते, पाणीसमस्यांवरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये येत असल्याने शहरातील सर्वच रस्ते चकाचक होत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील चार महिन्यांपासून अनेक वेळा सिडकोकडे मागणी करून रस्ते दुरुस्त होत नव्हते. मात्र, पंतप्रधानांच्या एका सभेमुळे शहरातील रस्ते चकाचक होणार असतील तर पंतप्रधानांचे स्वागतच आहे, अशी भावना खारघरमधील रहिवासी स्वप्निल पवार यांनी व्यक्त केली आहे. सिग्नल यंत्रणा, वाहतूक व्यवस्था नियंत्रणासाठीही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. खारघर, पनवेल, कळंबोली परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येत असून पावसामुळे पडलेली झाडे, पालापाचोळाही त्वरित उचलण्यात आला आहे.
रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे यापूर्वीच निघाली आहेत. पाऊस थांबल्यावर ती कामे करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना दिले होते. अनुषंगाने ठेकेदारांनी कामे करायला सुरुवात केली आहे.
- रमेश गिरी, प्रशासक, खारघर सिडको