Road ownership claim | रस्त्याच्या मालकी हक्काचा वाद
रस्त्याच्या मालकी हक्काचा वाद

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटच्या बाहेरील रस्त्याच्या मालकीवरून एपीएमसी व महापालिकेमध्ये मतभिन्नता आहे. रस्त्याची देखभाल व संरक्षण कोणी करायची, यावरून जबाबदारी टाळली जात असून याचा गैरफायदा फेरीवाल्यांनी घेतला आहे. रस्त्यावरच मार्केट सुरू केले असून त्याचा त्रास व्यापारी, कामगारांसह वाहतूक पोलिसांनाही होऊ लागला आहे.
मुंबईमधील घाऊक बाजारपेठ नवी मुंबईत स्थलांतर करताना बाजार समितीला ७२ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे.

मार्केटच्या आतमधील रस्ता व इतर सुविधा देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. संरक्षण भिंतीच्या बाहेरील जबाबदारी महापालिकेची आहे. मसाला, भाजी, फळ व धान्य मार्केटच्या पूर्व बाजूला सिडकोने मुख्य रस्त्याला लागून सर्व्हिस रोड तयार केला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी, हे अद्याप निश्चित केलेले नाही. या रस्त्याची मालकी महापालिकेकडे आहे की एपीएमसीकडे, हेही अद्याप निश्चित झालेले नाही. मसाला मार्केटच्या बाहेरील रस्त्यावर पाच वर्षांपासून अनधिकृतपणे मार्केट सुरू झाले आहे. भाजी व फळ मार्केटमधून काही विक्रेते जमिनीवर पडलेला माल उचलून तो या ठिकाणी पदपथ व रस्त्यावर विकू लागले आहेत. पूर्वी या ठिकाणी २० ते २५ विक्रेते होते. सद्यस्थितीमध्ये १०० पेक्षा जास्त फेरीवाले येथे व्यापार करू लागले आहेत.
>पार्किंगसाठी भूखंड
एपीएमसीच्या चार मार्केटच्या पूर्वेला असलेला सर्व्हिस रोड हा पार्किंगसाठी असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका व एपीएमसी प्रशासनाने सविस्तर सर्वेक्षण केले, तर या ठिकाणी व्यापारी व खरेदीदारांची वाहने उभी करणे शक्य होणार आहे. या ठिकाणी कुंपण टाकून फेरीवाल्यांना अटकाव करावा, अशी मागणी केली जात आहे. सर्व्हिस रोडला कुंपण टाकल्यास तेथे होणारे अतिक्रमण थांबेल व पार्किंगचा प्रश्नही सुटेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
>फेरीवाल्यांमुळे होत आहे वाहतूककोंडी
मुंबई बाजार समिती देशातील प्रमुख बाजारपेठेपैकी एक आहे. या ठिकाणी देश, विदेशातील शिष्टमंडळ मार्केट पाहण्यासाठी येत असतात. मार्केटमध्ये जाण्यासाठीच्या रोडवरील या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे एपीएमसीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट या प्रतिमेलाही धक्का बसू लागला आहे.
याशिवाय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीहोऊ लागली आहे. बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, शहरातील दक्ष नागरिक सर्वांनी या फेरीवाल्यांविषयी तक्रार केली आहे. तुर्भे विभाग कार्यालयाने अनेक वेळा फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे; कारवाई केली की, दुसºया दिवशी पुन्हा जैसे थे स्थिती राहत आहे.
यापूर्वी कारवाई करणाºया पथकावर हल्ला करण्यात आला होता. येथील मालाचा दर्जाही चांगला नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बाजार समितीने माथाडी भवनच्या बाजूला असलेल्या रोडवर तारेचे कुंपण घातले आहे; परंतु दुसºया बाजूला अद्याप कुंपण घातलेले नाही.
मालकी महापालिकेची की एपीएमसीची, हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न रखडला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालिका व एपीएमसीच्या वरिष्ठ अधिकाºयांना एकत्र चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Web Title: Road ownership claim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.