दरडींचा धोका, सारसई-माडभुवन वाडीच्या ९७ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
By नारायण जाधव | Updated: July 28, 2023 20:11 IST2023-07-28T20:11:16+5:302023-07-28T20:11:23+5:30
गेल्या वर्षापासून या वाडीलगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत.

दरडींचा धोका, सारसई-माडभुवन वाडीच्या ९७ कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत सारसई-माडभुवन ही आदिवासी वाडी गेली कित्येक वर्षे डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहे. गेल्या वर्षापासून या वाडीलगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत. यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर ही बाब येथील ग्रामस्थांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या वाडीतील ९७ कुटुंबातील ३७२ सदस्यांचे शुक्रवारी कर्नाळा गारमेंटच्या रिकाम्या इमारतींत स्थलांतर करून त्यांना अत्यावश्यक चीजवस्तू देण्यात आल्या.
तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, वनविभागाचे अधिकारी काटकर यांनी संयुक्तरीत्या प्रत्यक्ष डोंगरवर चढून नैसर्गिक पडलेल्या वाडीतील भेगांची पाहणी करून दोन दिवसांत स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी कर्नाळा गारमेंटच्या रिकाम्या इमारतींमध्ये सुव्यवस्था करून सर्व कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संभाजी शेलार, मंडळ अधिकारी तुषार काकडे, तलाठी एस. टी. तवर, सरपंच नाजनीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत, विजय मिरकुटे, ग्रामसेविका वैशाली जाधव ग्रा. पं. सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.