बेवारस वाहने रस्त्यावर धूळखात; कारवाईस विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:15 PM2019-12-08T23:15:33+5:302019-12-08T23:15:50+5:30

वर्षभरापूर्वी पनवेल महापालिकेने दिल्या होत्या नोटिसा

Reckless vehicles in the dust in the streets; Action delayed | बेवारस वाहने रस्त्यावर धूळखात; कारवाईस विलंब

बेवारस वाहने रस्त्यावर धूळखात; कारवाईस विलंब

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उभी असलेली बेवारस वाहने जप्त करणार असल्याच्या नोटिसा वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या वतीने लावण्यात आल्या आहेत. वाहनधारकांनी ही वाहने न हटवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले होते. मात्र, जवळपास वर्ष होत असले तरी ही वाहने रस्त्यावरच धूळखात पडून असल्याने वाहतुकीस अडथळ्याची ठरत आहेत.

रोडपाली परिसरात अवजड वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यापैकी काही वाहने ही गेले अनेक महिनोन्महिने एकाच जागेवर उभी आहेत. कामोठे, नवीन पनवेल, कळंबोली खांदा वसाहत आणि खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात गॅरेज आहेत. तिथेही बंद अवस्थेत असलेली वाहने अनेक महिन्यांपासून पडून आहेत.

कामोठे वसाहतीतील वेंकट प्रेसिडेन्सी हॉटेल समोरील रस्त्यावर, खांदा वसाहतीत सेक्टर १ आणि खारघर-बेलपाडा येथे रस्त्याच्या बाजूला अनेक बंद आणि बेवारस चारचाकी गाड्या पडून आहेत. दुचाकींच्या गॅरेजसमोरही अशाच प्रकारे धूळखात पडलेल्या गाड्या दिसून येत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या बिल्डिंगसमोर तसेच मोकळा जागेमध्ये भंगार वाहने पडून आहेत.

कळंबोली स्टील मार्केटमधील रस्त्यांवर जुनी वाहने खूप वर्षांपासून उभी आहेत. मधल्या काळात स्टील मार्केट कमिटीने काही बेवारस वाहने उचलली होती; परंतु आजही मार्केट परिसरात हजारो वाहने बंदावस्थेत पडून असल्याचे दिसते. स्टील मार्केट आणि सिडको वसाहतींमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात आढळत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी महापालिका,परिवहन विभाग, वाहतूक आणि स्थानिक पोलिसांकडे येत आहेत.

वर्षाच्या सुरुवातीलाच पनवेल महापालिकेने बेवारस वाहनांवर स्टिकर लावून ते ४८ तासांच्या आत उचलण्याचे आवाहन मालकांना केले होते. अन्यथा, ती जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येईल, असे नोटिसमध्ये म्हटले होते. मात्र, वर्षभरानंतरही अनेक गाड्या जागच्या जागीच आहेत. महापालिकेकडून कठोर कारवाई होत नसल्याने शहरात बेवारस गाड्यांची संख्या वाढत असल्याची प्र्रतिक्रिया अजित नाळे या रहिवाशाने दिली.

कळंबोली वसाहतीत सर्वाधिक भंगार गाड्या

कळंबोली वसाहतीच्या बाजूलाच स्टील मार्के ट असल्याने येथे दिवसभर हजारो ट्रक, कंटेनर, टँकर येतात. पैकी बहुतांश वाहने अवजड वाहने वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जातात. तर काही बंदावस्थेत, भंगारात निघालेली वाहनेही तिथेच पडून आहेत.
मोकळ्या जागेवर रोडपालीत वसुली दादांनी बेकायदेशीर पार्किंग थाटले आहेत. तेथे अनधिकृत गॅरेज सुरू आहेत. त्यामुळे जुनी वाहने या ठिकाणी अनेक दिवसांपासून पडून आहेत. कळंबोलीत सर्वात जास्त बेवारस, भंगार आणि नादुरुस्त वाहने आढळतात.
गाड्या उचलण्यासाठी यंत्रणाच नाही

पनवेल महापालिका हद्दीत शेकडो वाहने बंद, रस्त्यालगत बेवारसरीत्या उभी आहेत. या वाहनांबाबत जानेवारी महिन्यात महापालिकेकडून वाहने उचलण्यात येणार असल्याचे स्टिकर लावण्यात आले; परंतु महापालिकेकडे वाहने उचलण्यासाठी यंत्रणा तसेच टोचणगाडी नसल्यामुळे दिरंगाई झाली असल्याचे समजते.

पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. लवकरच रस्त्यालगत लावण्यात आलेल्या गाड्या उचलण्यात येतील.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, महापालिका पनवेल

Web Title: Reckless vehicles in the dust in the streets; Action delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.