- सूर्यकांत वाघमारे/वैभव गायकर, नवी मुंबईगुरुवारी आगमन होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सव काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सुमारे ६८ हजार घरगुती तर दीड हजार सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे.गतवर्षी गणरायाला निरोप दिल्यानंतर पुढच्या वर्षीच्या आगमनाची गणेशभक्तांना लागलेली प्रतीक्षा संपलेली आहे. शहरात उत्सवाला कसलेही गालबोट लागू नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. याकरिता पुढील दहा दिवस शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. स्थानिक पोलीस ठाणेनिहाय हा बंदोबस्त लावला जाणार असून रात्रीच्या गस्तीवर देखील विशेष भर दिला जाणार आहे. त्याशिवाय सार्वजनिक मंडळे व सोसायटी यांना देखील दक्षतेच्या सूचना पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या आहेत. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या सूचनेनुसार परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप व परिमंडळ २ चे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी मंडळांच्या बैठका घेतलेल्या आहेत. या बैठकीत केलेल्या सूचनेनुसार परिमंडळ १ मधील ७२ तर परिमंडळ २ मधील २५ सार्वजनिक मंडळे रस्त्याऐवजी मैदानात गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतुकीच्या मार्गात बदल करुन प्रसंगी उद्भवणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली आहे.मंडळांनी मंडपात व मंडपाबाहेर सुरक्षेची खबरदारी घेवून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या देखील सूचना पोलिसांनी केलेल्या आहेत. त्याशिवाय अनावश्यक गर्दी टाळून गैरप्रवृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी स्वयंसेवक नेमण्याचेही सांगितले आहे. तर आवश्यक ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत. गतवर्षीनुसार यंदाही पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घरगुती व सार्वजनिक अशा एकूण ६९ हजार गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. गतवर्षी परिमंडळ १ मध्ये ३१ हजार ६५५ घरगुती व १०६४ सार्वजनिक तर परिमंडळ २ मध्ये ३५ हजार ८०० घरगुती व ३५० सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला होता.आगमनानंतर दीड दिवसापासून गणरायाच्या विसर्जनाला सुरवात होते. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच महापालिका, नगरपरिषद देखील सज्ज झाले आहे. परिमंडळ १ मध्ये २३ तर परिमंडळ २ मध्ये ३० ठिकाणी विसर्जनाची सोय केली जाणार आहे. मूर्तीच्या विसर्जनासाठी तराफे, जलतरणपटू त्यासह प्रथमोपचाराचीही सोय केली जाणार आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज
By admin | Updated: September 17, 2015 00:14 IST