नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा ४५ मिनिटांत, सिडको बांधणार २६ कि.मी.चा उन्नत मार्ग, ८००० कोटींचा खर्च अपेक्षित
By नारायण जाधव | Updated: March 30, 2025 10:05 IST2025-03-30T10:05:11+5:302025-03-30T10:05:37+5:30
CIDCO News: येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे.

नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा ४५ मिनिटांत, सिडको बांधणार २६ कि.मी.चा उन्नत मार्ग, ८००० कोटींचा खर्च अपेक्षित
- नारायण जाधव
नवी मुंबई - येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. यानुसारच अटल सेतूने राजधानी मुंबईला या विमानतळाशी जाेडल्यानंतर ठाणे शहरही विमानतळाला जोडण्यासाठी सिडको २६ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग बांधणार आहे. त्याचा डीपीआर तयार करून व्यवहार सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.
ठाणे शहराला नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी सध्याचा ठाणे-बेलापूर मार्ग आणि पाम बीच मार्गाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मात्र, या दाेन्ही मार्गांवरील वाहतूक लक्षात घेता झटपट विमानतळावर पोहोचण्यासाठी सिडकोने ठाण्याहून थेट विमानतळापर्यंत विनाअडथळा पोहोचण्यासाठी हा २६ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला आहे. ठाण्याच्या वेशीवरील पटनी चौक ते वाशीपर्यंत खारफुटीचा फारसा अडथळा नसला तरी वाशी ते विमानतळापर्यंतच्या डबल डेकर रस्त्याच्या मार्गात अनेक ठिकाणी खारफुटी आणि सीआरझेड क्षेत्र बाधित होणार आहे. त्याच्या परवानग्यांचा अडथळा सिडकोला पार करावा लागणार आहे.
असा असेल नवा मार्ग
सिडकोने प्रस्तावित केलेल्या २६ कि.मी. उन्नत मार्गाची सुरुवात ही दिघ्यातील पटणी चौकापासून होणार आहे. त्याचा पहिला टप्पा वाशीपर्यंत १७ कि.मी. राहणार असून, तो ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असेल. पुढे वाशी ते नवे विमानतळापर्यंतचा ९ कि.मी.चा मार्ग हा उन्नतच असून, मात्र दुमजली बांधण्याचे नियोजन आहे. या मार्गावर अंदाजे ८००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
वनजमिनीचा अडथळा दूर
नवी मुंबई विमानतळाला सर्व बाजूंनी जोडण्यासाठी सिडकोने विविध रस्ते आणि पूल प्रस्तावित केले आहेत. आता अन्य एका रस्त्यासाठी उलवे नदीवरील बंधारा तोडून पूल बांधण्यासाठी उलवे आणि सोनखार खाडीनजीकची ४८५९ चौरस मीटर वनजमीन वळती करण्यास वनविभागाने २५ मार्च रोजी मंजुरी दिली.