रत्नागिरी : दिवाळीसाठी एस. टी.कडून जादा गाड्या
By Admin | Updated: October 7, 2014 23:42 IST2014-10-07T22:10:02+5:302014-10-07T23:42:55+5:30
महाविद्यालयांना २० ते २२ दिवस दीपावलीची सुटी असते

रत्नागिरी : दिवाळीसाठी एस. टी.कडून जादा गाड्या
रत्नागिरी : दीपावलीचा सण अवघ्या दोन आठवड्यांवर आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या सणासाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. रत्नागिरी विभागातून दररोज मुंबई मार्गावर १०४ गाड्या धावत असल्या तरी ३२ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांना २० ते २२ दिवस दीपावलीची सुटी असते. शिक्षक, तसेच विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात परजिल्ह्यातील मंडळी कार्यरत आहेत. दिवाळीसाठी बहुतांश मंडळी गावाकडे जातात. शिवाय सुटीच्या कालावधीत देवदर्शन फिरावयास जाणाऱ्या मंडळींची संख्या अधिक आहे. एस. टी.कडून ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना सुरू आहे. त्याचाही लाभ दीपावली सुटीत घेणारी मंडळी अधिक आहेत. त्यामुळे रत्नागिरी विभागातून १६ ते २६ आॅक्टोबर कालावधीत दररोज ३२ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे.दापोली ते कल्याण, मुंबई, चिपळूण ते बारामती, सातारा, गुहागर ते बोरिवली, भांडूप, चिंचवड, देवरूख ते इचलकरंजी, सावंतवाडी, रत्नागिरी ते कोल्हापूर, चिपळूण, लांजा ते मुंबई, मंडणगड ते नालासोपारा मार्गावर फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. प्रवासी भारमान लक्षात घेऊन गाड्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आॅनलाईन आरक्षण सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या एस. टी.चे आरक्षण करणे शक्य होत आहे. दीपावलीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या मंडळींची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून गाड्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)