ऐरोलीत जेवणाच्या थाळीत सापडला उंदीर; हॉटेल चालकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 08:10 IST2025-03-10T08:09:55+5:302025-03-10T08:10:01+5:30
ग्राहकांच्या जीवाशी खेळ

ऐरोलीत जेवणाच्या थाळीत सापडला उंदीर; हॉटेल चालकावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा
नवी मुंबई : हॉटेलमध्ये जेवणासाठी वाढलेल्या थाळीत चक्क उंदीर आढळल्याची घटना ऐरोलीतील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये घडली. महिला दिनाच्या औचित्यावर काही महिला हॉटेलमध्ये स्नेहभोजन करण्यासाठी गेल्या असता, हा प्रकार घडला. यानंतर काही महिलांना उलटीचा त्रास होऊ लागल्याने ग्राहक व हॉटेल चालक यांच्यात वाद होऊन तणाव निर्माण झाला होता.
घडलेल्या या प्रकाराबाबत हॉटेल चालक, मालक यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
ऐरोली परिसरात राहणाऱ्या ज्योती कोंडे (४७) या त्यांच्या १० सहकारी महिलासोबत महिला दिनानिमित्ताने शनिवारी रात्री ऐरोली सेक्टर ४ येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये स्नेहभोजनासाठी गेल्या होत्या.
त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे त्यांना थाळीत जेवण वाढले होते. त्याचवेळी एका महिलेच्या थाळीत उंदराचे मृत पिल्लू आढळून आले.
या प्रकारावरून शहरातील इतरही हॉटेल आस्थापनांमधील किचनच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर अशा गलिच्छ अवस्थेत हॉटेलचे किचन असतानाही आस्थापना चालत असताना अन्न व औषध प्रशासनासह संबंधित सर्वच प्रशासनाने पाहणी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्राहकांच्या जीवाशी खेळ
घडलेला प्रकार ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याने सर्वांनी किचन तपासणीची मागणी केली. त्यावेळी एका वेटरने आतून किचन बंद करून ठेवले. अनेक प्रयत्नानंतर ग्राहक हॉटेलच्या किचनमध्ये पोहोचले असता, मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून आले.
काहींना उलटीचा त्रास
मृत उंदीर भाजीत असल्याचे लक्षात येताच महिलांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, ती भाजी खाल्ल्याचे लक्षात येताच काही महिलांना उलटीचा त्रास होऊ लागला. हॉटेलच्या किचनमध्ये ज्या भांड्यात हे जेवण ठेवण्यात आले होते, त्यामध्ये हा उंदीर पडून मृत पावल्याचे स्पष्ट झाले. तर ग्राहकांच्या संतापानंतर हॉटेल चालकाने ते मान्य करत क्षमादेखील मागितली.