स्फोटात पावसाचा अडथळा

By Admin | Updated: July 16, 2017 02:51 IST2017-07-16T02:51:53+5:302017-07-16T02:51:53+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाच्या स्फोटात पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे.

Rain interruption in explosion | स्फोटात पावसाचा अडथळा

स्फोटात पावसाचा अडथळा

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या खोदकामाच्या स्फोटात पुन्हा पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून लागून राहिलेल्या संततधारा पावसामुळे सुरुंग पेरण्याचे काम बंद करावे लागले आहे. दारूगोळा पेरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांत पाणी साचल्याने तुर्तास हे काम थांबविण्यात आल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा सामावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जात आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडीच्या उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात टेकडीवर स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, प्रायोगिक तत्त्वावर आतापर्यंत सुमारे ३५ स्फोट घडविण्यात आले आहेत; परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे कामात व्यत्यय आला आहे. मात्र, पावसाची उघडीप होताच हे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली.

Web Title: Rain interruption in explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.