माथेरानची राणी १ जूनपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू?
By Admin | Updated: May 24, 2017 01:32 IST2017-05-24T01:32:38+5:302017-05-24T01:32:38+5:30
माथेरानकरांची नाळ जुळलेल्या मिनीट्रेनला वर्षभरानंतर सातत्याने पाठपुरावा करून माथेरानकरांनी रुळावर आणले. त्यामुळे तिला एखाद्या नव्या नवलाईप्रमाणेच पाहण्यासाठी

माथेरानची राणी १ जूनपासून पर्यटकांच्या सेवेत रुजू?
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरानकरांची नाळ जुळलेल्या मिनीट्रेनला वर्षभरानंतर सातत्याने पाठपुरावा करून माथेरानकरांनी रुळावर आणले. त्यामुळे तिला एखाद्या नव्या नवलाईप्रमाणेच पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. माथेरानची राणी चाचणीनिमित्त माथेरानच्या रेल्वे स्थानकात दाखल झाली. या मिनीट्रेनच्या चाचणीमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १ जूनपासून मिनीट्रेन सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
९ मे २०१६ मध्ये क्षुल्लक कारणावरून ही सेवा रेल्वे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मागील वर्षभरापासूनच ही सेवा बंद असल्याने सर्वच व्यवहार कोलमडून गेले होते. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी वारंवार लोकसभेत या विषयावर पाठपुरावा केला होता. अनेकदा येथील राजकीय मंडळींनी तसेच स्थानिकांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने दिली आहेत. एकंदरीतच स्थानिक मंडळींच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आले आणि २२ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता ट्रायल म्हणून मिनीट्रेन माथेरानच्या स्थानकात दाखल झाली.
रेल्वेमंत्री प्रभूंच्या कृपेमुळे माथेरान मिनीट्रेनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ७ कोटी रु पये मंजूर करून या कामासाठी ठेकेदारामार्फत कामाला गती आणून १ जूनपासून मिनीट्रेन सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. यासाठी येथे कामगारांमार्फत दिवस-रात्र काम चालू आहे. महत्त्वाच्या धोकादायक ठिकाणी कठडे बांधण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सर्व कामे पूर्ण होऊन ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सकाळी९.३० वाजता नेरळ स्थानकातून माल डबे जोडून मिनीट्रेन माथेरानच्या दिशेने निघाली. जिथेजिथे धोकादायक ठिकाणे आहे तिथे तिथे काम पूर्ण करून ही मिनीट्रेन सायंकाळी ४.४० ला माथेरान स्थानकात पोहोचली. या ट्रेनचे स्वागत करण्यासाठी नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते या मिनीट्रेनचे माथेरान स्थानकात जंगी स्वागत झाले. या मिनीट्रेनसाठी लोको पायलट म्हणून सुनील मिसाळ व राकेश शर्मा तर गार्ड म्हणून शशी धुमाळ यांनी आपले कर्तव्य बजावले. या ट्रेनच्या देखरेखीसाठी असलेले की मॅन शरद सानप व पीडब्लूआयचे मधुसूदन मोरया यांनी ही ट्रेन माथेरान स्थानकापर्यंत आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,महिला बालकल्याण सभापती प्रतिभा घावरे, बांधकाम सभापती शकील पटेल, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यासह अन्य नागरिक रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित होते.