सार्वजनिक आरोग्य विभाग करणार १०० हून अधिक सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण
By नारायण जाधव | Updated: October 12, 2022 13:48 IST2022-10-12T13:47:04+5:302022-10-12T13:48:13+5:30
- हार्ट फाउंडेशनच्या उपक्रमाला नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलची साथ

सार्वजनिक आरोग्य विभाग करणार १०० हून अधिक सोसायट्यांना डिजिटल हेल्थ बोर्डचे वितरण
नवी मुंबई: मलेरिया आणि डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग (एडीएचएस मुंबई), हार्ट फाउंडेशन आणि मेडिकव्हर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आणि पनवेलमधील 100 सोसायट्यांना विविध आरोग्य समस्या, आजारांची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी आदींविषयी माहिती सादर करण्यासाठी डिजिटल हेल्थ बोर्ड वितरित करून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
मलेरिया, डेंगू आणि इतर आजारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हा संयुक्त उपक्रम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा एनव्हीबीडीसीपी मुंबईचे डॉ. बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते या उपक्रमाची घोषणा करून डिजिटल हेल्थ बोर्डचे अनावरण करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट काही सेकंदात व्हायरल होऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन काहीही शेअर करताना किंवा पोस्ट करताना सावध राहण्याबाबत याठिकाणी जागरुक करण्यात आले. एखाद्याने वैद्यकीय माहितीशी संबंधित अस्सल आणि अधिकृत माहिती सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून एडीएचएस एनव्हीबीडीसीपी , सार्वजनिक आरोग्य विभाग केंद्र सरकार, पनवेल महानगरपालिका, हार्ट फाउंडेशन आणि मेडिकव्हर हॉस्पिटलने सार्वजनिक आरोग्यासाठी एक उत्तम पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील 100 हून अधिक सोसायट्यांना आरोग्यविषयक समस्या आणि त्याबाबतच्या खबरदारीची माहिती देणारे डिजिटल हेल्थ बोर्ड मिळणार आहेत.