पश्चिम बंगालवरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:08 IST2021-05-06T00:07:55+5:302021-05-06T00:08:07+5:30

पनवेलमध्ये उत्तर रायगड भाजपच्या वतीने आंदोलन : ममता सरकारविरोधात घोषणा

Protest against the attack on West Bengal | पश्चिम बंगालवरील हल्ल्याचा निषेध

पश्चिम बंगालवरील हल्ल्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवीन पनवेल : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला असून, या हिंसाचारात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात आल्याचा दावा करत उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये पक्ष कार्यालयाजवळ कोरोनासंदर्भातील नियम पाळून निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे त्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग घेऊन पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराचा व ममता बॅनर्जी सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या ममता सरकारचा निषेध असो, ममता सरकार हाय हाय, लोकशाहीची हत्या करणाऱ्या ममता सरकारचा धिक्कार असो, बंद करा बंद करा दादागिरी बंद करा अशा गगनभेदी घोषणा देऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या आंदोलनात भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकिंद काझी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते दिनेश खानावकर, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, रवींद्र नाईक, स्नेहल खरे, प्रकाश खैरे, प्रीतम म्हात्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

भाजप देशभरात लोकशाही पद्धतीने काम करीत आहे. त्याच अनुषंगाने निवडणुकाही लोकशाही पद्धतीने लढवतात. पश्चिम बंगालची निवडणूक संपल्यानंतर शांत मार्गाने कारभार होणे गरजेचे असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांची सर्रासपणे हत्या करण्याचे प्रकार झाले आहेत. या हिंसाचारातून ममता बॅनर्जी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याला सांभाळण्याची गरज होती. मात्र, तसे न करता अत्यंत चुकीचे राजकारण ममता सरकारने केले. या हिंसाचाराचा आम्ही जाहीर निषेध करतो.
- आमदार प्रशांत ठाकूर, 
जिल्हाध्यक्ष, उत्तर रायगड-भाजप

Web Title: Protest against the attack on West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा