कळंबोली : सिडको वसाहतीतील दोन फायर स्टेशन महापालिकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झालेल्या आहेत. फक्त जागाच मनपा देणार असल्याने या ठिकाणी नव्याने फायरमनची भरती करावी लागणार आहे. नवीन पनवेल आणि कळंबोलीचा त्यामध्ये समावेशआहे.दोन वर्षांपूर्वी पनवेल महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये सिडको वसाहतींचा समावेश असल्याने त्या सामावून घेण्यात येणार आहेत. दिवाळीपासून पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन सेवा वर्ग करून घेतली आहे. त्याअगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक शौचालय आदी विभाग ताब्यात घेतले आहेत. भविष्यात पाणीपुरवठा वगळता इतर विभाग हस्तांतरित करून घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये फायर स्टेशनचाही समावेश आहे. कळंबोली, नवीन पनवेल आणि खारघरमध्ये सिडकोची फायर स्टेशन्स आहेत.सध्या सिडकोकडूनच ही सेवा पुरविली जात आहे. खारघर वगळता इतर दोन फायर स्टेशन्स महापालिकेने ताब्यात घ्यावीत, असा प्रस्ताव सिडकोकडून देण्यात आलेला आहे. खारघर मात्र तूर्तास आपल्याकडे ठेवण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे. कळंबोली आणि नवीन पनवेल फायर स्टेशनमध्ये काम करीत असलेले मनुष्यबळ सिडको आपल्याकडे ठेवणार आहे.महापालिकेला नवीन मनुष्यबळ नेमावे लागणार आहे. त्या अनुषंगाने दोन फायरमनचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे आगोदरच सादर करण्यात आला आहे. या दोनही ठिकाणांहून काही मिनिटांत अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचतात. मोक्याच्या ठिकाणी असलेली फायर स्टेशन मनपाला दिली जाणार आहेत. त्याकरिता वाहनेसुद्धा नवीन घ्यावी लागणार आहेत. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आणखी तीन वाहने खरेदी करण्याकरिता निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.सिडकोने नवीन पनवेल आणि कळंबोली फायर स्टेशन हस्तांतरित करण्याकरिता प्रस्ताव दिला आहे का? याबाबत माहिती घ्यावी लागेल. मात्र, नोडमधील सेवा आपण घेणार असल्याने त्यामध्ये फायर स्टेशनचाही समावेश आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिकेची भूमिका सकारात्मक आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका
अग्निशमन केंद्र हस्तांतराचा प्रस्ताव; नवीन पनवेलसह कळंबोलीचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:55 IST