मुंबई पालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईकरांनाही ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 13:22 IST2023-06-03T13:21:53+5:302023-06-03T13:22:24+5:30
नवी मुंबई महापालिकेनं प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.

मुंबई पालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईकरांनाही ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी?
मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ऐरोली व बेलापूर मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोमध्ये कार्यरत प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. सिडकोतर्फे आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी नागरिकांसाठी अभय योजना राबवावी, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
याही केल्या सूचना
ऐरोली - कटाई उन्नत मार्गावर मुंबईच्या दिशेने येण्या आणि जाण्यासाठी मार्ग, पामबीच-घणसोली-ऐरोली रस्त्याच्या कामासह मतदारसंघातील विविध समस्या सोडवण्याबाबत सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.