गुन्ह्यांच्या सिद्धतेसाठी पुराव्यांचे जतन गरजेचे
By Admin | Updated: May 25, 2017 00:16 IST2017-05-25T00:16:22+5:302017-05-25T00:16:22+5:30
आधुनिक काळात सायबर क्राइम व तत्सम गुन्ह्यांच्या शाबितीकरणाकरिता आवश्यक पुराव्यांचे न्यायसहायक वैधानिक पडताळणीअंती सुयोग्य जतन करणे आवश्यक आहे

गुन्ह्यांच्या सिद्धतेसाठी पुराव्यांचे जतन गरजेचे
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : आधुनिक काळात सायबर क्राइम व तत्सम गुन्ह्यांच्या शाबितीकरणाकरिता आवश्यक पुराव्यांचे न्यायसहायक वैधानिक पडताळणीअंती सुयोग्य जतन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रायगड जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, तसेच मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश (मोका) किशोर पेटकर यांनी केले आहे. मंगळवारी संध्याकाळी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित १५ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ््यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मेळाव्यातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना न्या. पेटकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात व्यावसायिक निपुणता उंचावण्याची जाणीव निर्माण करण्यासाठी, तसेच कौशल्यवृद्धीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसांच्या १५व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन येथील रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलेल्या या मेळाव्यात, कोकण पोलीस परिक्षेत्रातील रायगड, ठाणे ग्रामीण, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील एकूण १० अधिकारी व ५७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. तपासिक अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्ण पद्धतीने करता यावा, याकरिता या मेळाव्यामध्ये न्यायसहायक वैधानिक पडताळणी, फोटोग्राफी, डॉगस्कॉड, घातपातविरोधी तपासणी, सायबर सेल, सीसीटीएनएस अशा एकूण सहा विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या समारोप समारंभात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ठाणे ग्रामीण पोलीस संघाला सांघिक विजेते पदाचा मान मिळाला. या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक हे पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी कोकण परिक्षेत्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मेळाव्यातील, ‘न्यायसहायक वैधानिक पडताळणी’ या विषयाच्या स्पर्धेचे परीक्षक रासायनिक विश्लेषक व फिंगर प्रिंटतज्ज्ञ म्हणून सुरेश शिंदे व एस. एन. ठाकूर यांनी परीक्षण केले.
या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, सहा. पो. निरीक्षक गीताराम शेवाळे, सहा. पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, सहा. पो. निरीक्षक सागर कावळे आदी उपस्थित होते.