Problems with traffic congestion in Uran | उरणमधील वाहतूककोंडीची समस्या कायम

उरणमधील वाहतूककोंडीची समस्या कायम

उरण : उरणकरांच्या वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याचे आश्वासन सर्वच राजकीय पक्षांची प्रचारादरम्यान दिले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.

उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, उरण-पनवेल आणि गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर दररोज प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती रहदारी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. वाहतूककोंडीच्या समस्येविरोधात मागील काही वर्षांत अनेक आंदोलनेही झाली आहेत. मात्र, अद्याप ही समस्या जैसे थे आहे.
उरण परिसरातील वाहतूककोंडीची अनेक कारणे आहेत.

जेएनपीटीने एनएचआयच्या माध्यमातून तीन हजार कोटींची सुरू असलेले सात उड्डाणपूल, सहा-आठ लेनच्या रस्त्यांचीच कामे मुदतीनंतर अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. बेशिस्त कंटेनर वाहतूक आणि रस्तोरस्ती अवैधरीत्या पार्किंग करण्यात येत असलेल्या वाहनांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. रस्तोरस्ती पडलेले मोठमोठे खड्डेही वाहतूककोंडीस कारणीभूत ठरत आहेत. येथील वाहतूकदार संघटनांवर जेएनपीटीचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न केल्यास संघटित वाहतूकदार संपाचे हत्यार उपसतात.

परिसरातील अवैध कंटेनर यार्डमधून कंटेनर मालाची देशभरात वाहतूक केली जाते. अशा मालवाहू कंटेनरसाठी रस्तोरस्ती कट देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे उरण-जेएनपीटी-आम्रमार्ग, गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावर वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते.
जनतेला भेडसावत आलेली वाहतूककोंडीची समस्या आणि खड्डेमय रस्त्यांपासून विद्यार्थी, कामगारांची सुटका व्हावी, यासाठी काही दिवसांपूर्वी उरणमधील युवकांनीही पुढाकार घेऊन लक्षवेधी आंदोलन केले होते.

करळ फाटा येथील आंदोलनानंतर युवकांनी जेएनपीटी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन शेकडो स्वाक्षºया असलेले निवेदनही दिले होते. याची दखल घेत प्रशासनाने अध्यादेश जारी करीत दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी ८ ते ११ तर संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान दररोज सहा तास अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही वाहतूककोंडीची समस्या सुटल्याचे दिसत नाही.

Web Title: Problems with traffic congestion in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.