ट्रान्स हार्बरच्या सिग्नलमध्ये बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:30 IST2019-03-30T00:30:45+5:302019-03-30T00:30:54+5:30
ट्रान्स हार्बर मार्गावरील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.

ट्रान्स हार्बरच्या सिग्नलमध्ये बिघाड
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अखेर दुरुस्तीनंतर सुमारे दीड तासाने रेल्वेसेवा सुरळीत झाली.
ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्याने सानपाडापर्यंत लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर रेल्वेवाहतूक पूर्ववत झाली. यामुळे अर्ध्या प्रवासात थांबलेल्या लोकलमधील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर सिग्नलमधील बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने त्यानंतर धावणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. तर वाशी, सानपाडा, तुर्भे या रेल्वेस्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी झाली होती. ऐन संध्याकाळच्या वेळेस घडलेल्या या बिघाडामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.