प्रियंकाच्या मृतदेहाची होणार डी.एन.ए. चाचणी
By Admin | Updated: May 24, 2017 01:27 IST2017-05-24T01:27:59+5:302017-05-24T01:27:59+5:30
तुकडे करुन टाकण्यात आलेल्या प्रियंकाच्या मृतदेहाची डी.एन.ए. चाचणी केली जाणार आहे.

प्रियंकाच्या मृतदेहाची होणार डी.एन.ए. चाचणी
सूर्यकांत वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : तुकडे करुन टाकण्यात आलेल्या प्रियंकाच्या मृतदेहाची डी.एन.ए. चाचणी केली जाणार आहे. तीनही तुकडे तिचेच आहेत का हे यामध्ये तपासले जाणार आहेत. मात्र ही चाचणी राज्यात होत नसल्यामुळे हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये नमुने पाठवले जाणार आहेत.
रबाळे एमआयडीसी येथे ६ मे रोजी प्रियंका गुरव (२३) या नवविवाहितेचे धड आढळून आले होते. पती सिध्देश गुरव याने लग्नाच्या पाचव्या दिवशी तिची हत्या करुन मृतदेहाचे तीन तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी एकून पाच जणांना अटक केली आहे. त्यामध्ये पती सिध्देश, सासरे मनोहर, सासू माधुरी, दुर्गेश पटवा व विशाल सोनी यांचा समावेश आहे. सासरच्यांनी हत्या केल्यानंतर पटवा याने मृतदेहाचे तुकडे करुन सोनी याच्या गाडीमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. या सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ मेपर्यंतची वाढीव पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, प्रियंकाचा मृतदेह तिच्या माहेरच्यांनी ओळखला असला तरीही तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्यामुळे खात्री पटवण्यासाठी डी.एन.ए. चाचणीचा आधार घेतला जाणार आहे. परंतु त्यापैकी एक चाचणी राज्यात कुठेच होत नसल्याने पोलिसांपुढे काहीशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. मृतदेहाचे तीनही तुकडे एकाच व्यक्तीचे आहेत का, हे कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासले जाणार आहे. परंतु प्रियंकाचे आई - वडील हयात नसल्यामुळे तो मृतदेह प्रियंकाचाच आहे का हे तपासणे कठीण झाले आहे. आई-वडिलांच्या व मुलांच्या डी.एन.ए.चे साम्य ओळखण्याचे तंत्रज्ञान कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. परंतु भावंडांचे डी.एन.ए. तपासण्याचे तंत्रज्ञान राज्यात कुठेच नाही. अखेर पोलिसांनी कलिना लॅबच्या मध्यस्थीने हैदराबाद लॅबकडून चाचणीला होकार मिळवला आहे. प्रियंकाचे भाऊ अथवा बहीण यांचे डी.एन.ए. व मृतदेहाचे डी.एन.ए. तपासण्यात येणार आहे.